Lockdown: आडमुठ्या पोलिसांमुळे आजारी बापाला खांद्यावर घेऊन मुलाला पायी जावं लागलं

son carrying father
केरळमधील धक्कादायक प्रकार

कोरोना विरोधात दिवसरात्र रस्त्यावर सुरक्षा देणाऱ्या पोलिसांचे एकाबाजुला कौतुक होत असताना दुसरीकडे काही कठोर पोलिसांचा काळा चेहराही समोर येत आहे. केरळच्या कुलथुपुझा येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. आपल्या आजारी वडिलांना रिक्षातून घेऊन जात असताना पोलिसांनी ही रिक्षा अडवून ठेवली. शेवटी मुलानेच आपल्या ६५ वर्षीय आजारी वडिलांना खांध्यावर घेऊन उरलेले अंतर कापले.

केरळच्या राज्य मानवाधिकार आयोगाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून सु मोटो तक्रार दाखल केली आहे. ही घटना बुधवारी घडली. त्याचे झाले असे की, कुलथुपुझाचे रहिवासी असलेल्या एका ६५ वर्षीय व्यक्तिला पुनालुर तालुक्यातीकल रुग्णालयात दाखल केले होते. काल त्यांना सुट्टी देण्यात आली. त्यामुळे त्यांचा मुलगा रिक्षाने त्यांना घरी घेऊन येत होता. मात्र लॉकडाऊन असल्यामुळे पोलिसांनी ही रिक्षा अडवून ठेवली. मुलाने हॉस्पिटलचे सर्व कागदपत्रे दाखवून देखील या कुटुंबाला रिक्षातून पुढे जाऊन दिले नाही. शेवटी मुलानेच मग आपल्या वडिलांना उचलून घेत पायीच घर गाठले.

यावेळी मुलाच्या आईलाही हातात सामानाच्या पिशव्या घेऊन मुलासोबतच चालावे लागले. जवळपास एक किलोमीटरचे अंतर पायी चालत जात असताना अनेक लोकांनी या प्रसंगाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. तसेच हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याची मानवाधिकार आयोगाने स्वतःहून दखल घेत तक्रार दाखल केली. आता अमानुष वागणूक देणाऱ्या या पोलिसांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

कोरोनाचे रुग्ण सर्वात आधी केरळ राज्यात आढळून आले होते. आजघडीला तिथे ३८७ रुग्ण आहेत. त्यापैकी २११ रुग्ण बरे झालेले आहेत.