देशभरातील पीएफआय नेत्यांविरोधात NIA, ED ची मोठी कारवाई; छापेमारी करत 100 कार्यकर्त्यांना अटक

kerala nia and ed conducting raids at houses of pfi leaders including house of oma salam

नवी दिल्ली: टेरर फंडिंग आणि कॅम्प चालवण्याप्रकरणी देशभरात PFI म्हणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरोधात  तपास यंत्रणा NIA, ED ने मोठी कारवाई केली आहे. केरळ, तामिळनाडू आणि यूपीसह देशातील 10 राज्यांमध्ये एनआयए आणि ईडीच्या पथकांनी पीएफआयच्या राज्य ते जिल्हा पातळीवरील नेत्यांच्या घरांवर छापेमारी केली. यानंतर त्यांच्या 100 हून अधिक कार्यकर्त्यांना अटक केली आहे. एनआयए आणि ईडीच्या रडारवर पीएफआयचे अध्यक्ष ओएमए सलाम असून ज्यांच्या घरावर मध्यरात्री ईडीने छापा टाकला आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, एनआयए आणि ईडीच्या पथकाने राज्य पोलिसांच्या मदतीने दहा राज्यांमध्ये छापे टाकले. यादरम्यान त्यांनी पीएफआयच्या 100 हून अधिक कार्यकर्त्यांना अटक केली. एनआयएने तामिळनाडूतील कोईम्बतूर, कुड्डालोर, रामनाद, दिंडुगल, थेनी आणि थेनकसीसह अनेक ठिकाणी पीएफआय पदाधिकाऱ्यांच्या घरांची झडती घेतली. चेन्नई पीएफआयच्या पुरसवक्कम येथील राज्य मुख्य कार्यालयातही झडती घेण्यात येत आहेत.

बुधवारी मध्यरात्री एनआयए आणि ईडीने पीएफआयचे अध्यक्ष ओएमए सलाम यांच्या मलप्पुरम जिल्ह्यातील मंजेरी येथील घरावर अचानक छापा टाकला. अजूनही छापेमारी सुरू आहे. दरम्यान या कारवाईविरोधात आता पीएफआयचे कार्यकर्ते आक्रमक होत आंदोलन करत आहेत. शेकडो कार्यकर्ते सभापतींच्या घराबाहेर जमले. इतकंच नाही तर एनआयएच्या छाप्यांविरोधात मंगळुरूमध्ये पीएफआय आणि एसडीपीआय कार्यकर्त्यांची निदर्शनेही सुरू आहेत.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास संस्थेने गुरुवारी सकाळी पीएफआय आणि दहशतवाद्यांना कथित समर्थन करणाऱ्या व्यक्तींसह गटांविरुद्ध देशव्यापी शोध मोहीम सुरू केली. आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या सर्च ऑपरेशनदरम्यान टेरर फंडिंग, प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे आणि बंदी घातलेल्या संघटनांमध्ये सामील होण्यासाठी लोकांना कट्टरपंथीय बनवणे यात कथित सहभाग असलेल्या लोकांच्या घरांची झडती घेतली जात आहे, असे ते म्हणाले.


महापालिका, विधानसभा निवडणूक घ्या; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान