‘या’ राज्यात राजकीय इतिहासापेक्षा फेमस आहे तिथली बिर्याणी!

जाणून घ्या, या फेमस बिर्याणीच्या इतिहासाविषयी...

एखाद्या विशिष्ट क्षेत्राची, विभागाची कोणती न् कोणती खासियत असते. सध्या आगामी विधानसभा निवडणूकीच्या प्रचार मोहीमेची रणधुमाळी सुरू असताना निवडणुकीच्या राज्यांची जनतेत चांगलीच चर्चा होत आहे. उत्तर केरळमधील किनारपट्टी असलेले थालास्सेरीची ओळख ही गेल्या अनेक वर्षांपासून बालेकिल्ला म्हणून आहे. डाव्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे हे शहर तेथील राजकीय इतिहासाच्या अनेक कहाण्यांमुळे बर्‍याचदा चर्चेत असते. पण या व्यतिरिक्त अशीही एक गोष्ट आहे ज्यामुळे हे शहर नेहमीच चर्चेत आहे. ती गोष्ट म्हणजे या शहरात मिलणारी थालास्सेरी बिर्याणी. (Thalassery Biryani )

थालास्सेरीच्या इतिहासाइतकाच बिर्याणीचा इतिहास

बिर्याणीच्या संदर्भात सांगायचे झाले तर थालास्सेरी हे ठिकाण सर्वत्र चर्चेत आहे. तेथील खाद्य-संस्कृती, जेवण बनविण्याची शैली आणि तेथील पदार्थांवर अवलंबून अनेक बाबतीत थालास्सेरी भिन्न आहे. थालास्सेरी येथील दम बिर्याणी सर्वाधिक झणझणीत बिर्याणी म्हणून ओळखली जाते. दरम्यान, या बिर्याणीचा इतिहास जितका जुना आहे तितकाच थालास्सेरीचा देखील जुना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, थालास्सेरी हे मलबार प्रदेशातील सर्वात प्राचीन व्यापार बंदरांपैकी एक आहे. हे ब्रिटिश लोकांच्या व्यापाराचे केंद्र म्हणून १६८० च्या दशकात अरबी किनाऱ्यालगत असणारे एक लहान किनारपट्टीचे शहर होते. केरळ आणि कर्नाटकच्या कोडागु प्रदेशातील मसाल्याचे पदार्थ या बंदरांद्वारे जगभरात निर्यात केले जात होते. ब्रिटीशांव्यतिरिक्त, फ्रेंच लोकांनी देखील हा व्यापार वाढविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे.

इथे झाला या बिर्याणीचा जन्म…

थालास्सेरी बिर्याणीच्या इतिहासाबद्दल अनेक गोष्टी आहेत. या इतिहासाच्या गोष्टींनुसार, या बिर्याणीचा जन्म इराणमध्ये झाला आणि भारतातील मोगलांनी जनतेला याची जाणीव करून दिली. थालास्सेरी बिर्याणी हे अरब आणि मोगल संस्कृतीचे प्रतिक मानले जाते. थालास्सेरीमध्ये अशी बिर्याणी उपलब्ध असणारी बरीच रेस्टॉरंट्स आहेत. यापैकीच एक रेस्टॉरंट हाशिम आणि त्याचा भाऊ चालवतो. हे दोघेही कन्नूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना हाशिम याने असे सांगितले की, जरी कोरोनामुळे आमच्या व्यवसायात मोठे नुकसान झाले असले तरी आम्ही बिर्याणीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली नाही.

थालास्सेरी शहरात असलेल्या २० वर्षांहून अधिक जूनं या रेस्टॉरंटमधील स्वयंपाकघर खवय्यांसाठी सदैव तत्पर असतं. याठिकाणी सकाळी ५ वाजता बिर्याणीची तयारी सुरू होते. बिर्याणीच्या सामग्रीच्या तयारीपासून त्याच्या कृतीला सुरूवात होते. यासाठी, कांदे, टोमॅटो आणि मसाले मोठ्या प्रमाणात आवश्यक असतात. साधारणतः एका रेस्टॉरंटमध्ये बिर्याणीच्या सुमारे ५०० ते ७०० प्लेट्सची विक्री केली जाते. ग्राहकांच्या म्हणण्यानुसाप, या फेमस बिर्याणीचा स्वाद वैशिष्ट्यपूर्ण असल्याने ग्राहक या बिर्याणीला पसंती देतात. या शहरातील राजकीय कारकिर्दीपेक्षा तेथील बिर्याणी अधिक फेमस आहे. दरम्यान आगामी केरळमधील निवडणुकीत एलडीएफ सत्तेत येणार, असा जनतेचा विश्वास आहे. मात्र खरं काय हे केवळ निवडणुकीच्या निकालावरूनच स्पष्ट होईल.