अमित शाह खलिस्तानींच्या रडारवर; इंदिरा गांधींची करून दिली आठवण

Amit Shah

 

अमृतसरः खलिस्तानींच्या विरोधात जाल तर इंदिरा गांधींसारखी तुम्हालाही किंमत चुकवावी लागेल, असा इशारा वजा धमकी वारीस पंजाब दे संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंहने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिली आहे. अमृतपाल हा खलिस्तानी समर्थक आहे.

खलिस्तानी चळवळ पुढे जाऊ देणार नाही, असे केद्रीय मंत्री शाह यांनी सांगितले होते. यावर प्रतिक्रिया देताना अमृतपालने शाह यांना इंदिरा गांधींच्या हत्येची आठवण करून दिली. खलिस्तानींच्या विरोधात गेल्याचे परिणाम इंदिरा गांधी यांना भोगावी लागले होते. त्यामुळे तुम्ही जर खलिस्तानी विरोधी भूमिका घेतलीत तर इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे तुम्हालाही त्याची किमत चुकवावी लागले. शाह यांनी हिंदू राष्ट्राची मागणी करणाऱ्यांचे समर्थन केले तर ते गृहमंत्री पदावर कसे राहतात हेदेखील आम्ही बघून घेऊ, असा इशारा वजा धमकी अमृतपालने केंद्रीय मंत्री शाह यांना दिली आहे.

लोकं हिंदू राष्ट्राची मागणी करू शकतात तर आम्ही खलिस्तानची मागणी का करु शकत नाही. आम्हाला कोणीच रोखू शकत नाही. ना पंतप्रधान नरेंद्र मोदी, ना गृहमंत्री अमित शाह, एवढंच काय तर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हेही आम्हाला रोखू शकणार नाहीत, असे सांगत इंदिरा गांधी यांना खलिस्तान विरोधी भूमिकेची किंमत मोजावी लागली होती, याची आठवणही अमृतपाल यांनी करुन दिली.

लवप्रीत तुफान या अमृतपालच्या सहकाऱ्याविरोधातील अटकेच्या निषेधार्थ  त्याच्या समर्थकांनी अजनाळा पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घातला. या गोंधळात सहा पोलीस जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.