किम जोंगला कोरोनाची शक्यता आणि उत्तराधिकाऱ्याचा सस्पेन्स!

kim jong un
किम जोंग उन

जागतिक स्तरावर कहर केलेला कोरोना, जागतिक अर्थव्यवस्थेवरचं संकट या मुद्द्यांप्रमाणेच सध्या एक प्रश्न जागतिक स्तरावर चर्चेचा विषय बनलाय. उत्तर कोरियामध्ये नक्की चाललंय काय? खरंतर उत्तर कोरिया हा जगातल्या इतर देशांसारखाच एक देश. पण तिथला हुकुमशहा किम जोंग उनमुळे हा देश जगाच्या पाठीवर सगळ्यात वेगळा भासतो आणि कायम राहण्याचा प्रयत्न करतो. आपल्या लहरी आणि पराकोटीच्या हुकुमशाही वृत्तीमुळे जगभरात कुप्रसिद्ध असलेल्या किम जोंग उनच्या प्रकृती अस्वास्थ्यावरून सध्या जगभरात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. कारण उत्तर कोरियाच्या राजघराण्याच्या कोणत्याही गोष्टीबद्दल कमालीची गुप्तता पाळली जाते. खुद्द किम जोंग उनला गुप्त न ठेवला लोकांसमोर आणलं हीच फार मोठी गोष्ट म्हणावी इतकं हे सगळं गुप्त असतं!

तर या किम जोंग उनला काहीतरी झालंय, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. कुणी म्हणतं त्याला ह्रदयविकार झालाय, तर कुणी म्हणतं त्याला मेंदूचा आजार झालाय. कुणी सांगतं त्याच्या ह्रदयात चुकीचा स्टेंट किंवा चुकीच्या जागी स्टेंट टाकला गेलाय तर कुणी म्हणतं त्याला कुठलातरी असाध्य आजार झालाय. पण त्याच्या या आजाराविषयी कमालीची गुप्तता असून तो आजघडीला हयात आहे की नाही? इथपासून चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारणंही तशीच आहेत…

  • काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात किम जोंग उन चक्कर येऊन पडला आणि तेव्हापासून तो गायब झाला!
  • किम जोंगची खासगी ट्रेन वुन्सनच्या समुद्र किनारी असल्याची छायाचित्र समोर आली. पण तिथेही तो नसल्याचा उ. कोरिया सरकारचा दावा
  • आजोबा किम इल सुंग यांच्या १०८व्या जयंतीच्या कार्यक्रमाला देखील किम अनुपस्थित होता
  • उ. कोरियाच्या पद्धतीप्रमाणेच किम जोंग किंवा त्याच्या कुटुंबाबद्दल कुणालाही काहीही माहिती नाही

आता इतक्या सिक्रेट माणसाविषयी जिथे त्याच्या देशातल्या लोकांनाही त्याबद्दल काही माहिती नाही, तिथे जगाला काय कळणार आहे? पण असं असताना देखील चीनमधून एक डॉक्टरांचं पथक उ. कोरियामध्ये दाखल झालं आहे. आता खुद्द किम जोंगशिवाय अजून कुणासाठी कोरोनाच्या या संकटात चीनी पथक उ. कोरियात दाखल व्हावं, इतकं त्या देशात दुसरं कुणीही महत्त्वाचं नाही. त्यामुळे थेट चीनमधून तज्ज्ञांचं पथक दाखल व्हावं, असं काय गंभीर किम जोंगला झालं असावं, याचा थांगपत्ता लागत नसला, तरी एक गंभीर शक्यता मात्र दाट होऊ लागली आहे.

किम जोंगला कोरोना?

उ. कोरियामध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही हे गायब होण्याच्या काही दिवसांपूर्वीपर्यंत किम जोंग उन ठामपणे सांगत होता. पण त्याचा स्वभाव पाहाता सत्य परिस्थिती त्याने लपवल्याचीच शक्यता जास्त आहे. पण या परिस्थितीमध्ये कोरोनाचा यशस्वीपणे सामना केलेल्या चीनमधून एक तज्ज्ञ डॉक्टरांचं पथ उ. कोरियामध्ये जर किम जोंग उनवर उपचार करण्यासाठी दाखल झालं असेल, तर त्याला कोरोना झाला असण्याची एक दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच उ. कोरियात कोरोनाचा एकही रुग्ण नाही हा आपला दावा जगासमोर उघडा पडू नये, म्हणून किम जोंगनेच ही बाब गुप्त ठेवली असण्याची शक्यता आहे.

किम जोंगच्या उत्तराधिकाऱ्याचं काय?

कोरोना किंवा इतर कोणत्याही आजारामुळे जर किम जोंगला काही झालंच, तर त्याची राष्ट्रप्रमुख पदाची गादी कोण सांभाळणार? यावर चर्चा सुरू आहे. कारण एका माहितीनुसार उ. कोरियाकडे ६ अण्वस्त्र असून ती चुकीच्या हातात पडली, तर जगासाठी ती चिंतेची बाब ठरेल. किम जोंगची पत्नी री सोल जू राजकीय विश्वात कार्यरत नसल्यामुळे ती त्याची जागा घेऊ शकणार नाही. एका मान्यतेनुसार किम जोंगची मुलं ८ ते ९ वर्षांपेक्षा मोठी नाहीत. त्यामुळे तीही जबाबदारी घेऊ शकणार नाही. त्यामुळे किम जोंग उनची बहीण किम यो जोंग हाच एकमेव पर्याय समोर आहे. ती उ. कोरियामध्ये किम नंतर दुसऱ्या क्रमांकाची असामी मानली जाते. त्यामुळे किमला काही झालंच, तर किम यो जोंग त्याची गादी सांभाळण्याची शक्यता आहे.