Gallantry Award 2021 : सॅपर प्रकाश जाधव मरणोत्तर कीर्ती चक्राने सन्मानित, डोळे पाणवतील अशी कहाणी

know about sapper prakash jadhav who posthumously awarded second-highest peacetime gallantry award kirti chakra
Gallantry Award 2021 : सॅपर प्रकाश जाधव मरणोत्तर कीर्ती चक्राने सन्मानित, डोळे पाणवतील अशी कहाणी

देशाच्या सुरक्षेसाठी अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या वीर जवानांना आज राष्ट्रपती भवनात शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मोदी मंत्रीमंडळातील इतर वरिष्ठ मंत्री आणि सैनिकांचे कुटुंबिय उपस्थित होते. यावेळी भारतीय लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सयच्या पहिल्या बटालियनमधील इंजिनीअर कॉर्प्सचे सॅपर प्रकाश जाधव यांना मरणोत्तर कीर्ती चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. शांततेच्या काळात दिले जाणारे हे शौर्य पदक आहे. असाधारण शौर्य आणि बलिदानासाठी हा सन्मान सैनिक आणि गैर-सैनिकांना दिला जातो. देशात आतापर्यंत ४८३ जवानांना कीर्ती चक्राने सन्मानित करण्यात आले आहे.

देशातील दुसरा सर्वोच्च शांतता कालीन शौर्य पुरस्कार

भारतीय लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सच्या पहिल्या बटालियनमधील इंजिनीअर कॉर्प्सचे सॅपर प्रकाश जाधव यांना शत्रूशी मुकाबला करण्याव्यतिरिक्त दाखवलेल्या शौर्यासाठी कीर्ती चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शहीद सॅपर प्रकाश जाधव यांच्या पत्नी राणी प्रकाश जाधव आणि आई शारदा जाधव यांनी राष्ट्रपती भवनात झालेल्या शानदार सोहळ्यात हा सन्मान स्वीकारला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शहीद प्रकाश जाधव यांना दुसरा सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित केले.

शत्रूंच्या अंदाधुंद गोळीबारात दाखवले धाडस

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत सॅपर प्रकाश जाधव शहीद झाले. २७ नोव्हेंबर २०१८ रोजी अनंतनाग जिल्ह्यातील रेडबनी बाला गावात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांनी मिळाली होती. यावेळी जवानांनी गावाला घेराबंदी घालत शोध मोहीम सुरु केली. या कारवाईचे नेतृत्व करत सॅपर प्रकाश जाधव हे त्यांच्या साथीदाऱ्यांच्या मदतीने पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास एका घरात घुसले. यावेळी त्या घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांना पायऱ्या चढताना पाहिले आणि अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली.

साथीदारांचे प्राण वाचवण्यासाठी दिले बलिदान

आपल्या साथीदारांच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेऊन सॅपर प्रकाश जाधव यांनी जीवाची पर्वा केली नाही. यावेळी सॅपर जाधव यांनी आपल्या साथीदाराला मागे ढकलतं दहशतवाद्यांच्या बेछुट गोळीबारात एका दहशतवाद्याला ठार केले. याचवेळी दुसऱ्या एका दहशतवाद्याने पेट्रोल बॉम्ब फेकला. यावेळी सावध होत सॅपर जाधव यांनी आपल्या साथीदारांना घरातून बाहेर पडण्याची सूचना केली आणि स्वतःच दुसऱ्या दहशतवाद्याला लक्ष्य करण्यास सुरुवात केली. मात्र तोपर्यंत सॅपर जाधव यांना गोळी लागली होती.

सॅपर जाधव यांच्या बलिदानाचा देश ऋणी 

जखमी अवस्थेतही सॅपर जाधव यांनी दुसऱ्या दहशतवाद्यावर गोळीबार केला आणि त्याचवेळी त्यांच्या हातातील शस्त्र निसटले. तोपर्यंत पेट्रोल बॉम्बची आग घरभर पसरली होती. आगीने एवढं भीषण रूप धारण केलं की, सॅपर जाधव आपल्या साथीदारांप्रमाणे घराबाहेर पडू शकले नाहीत. स्वत:च्या जीवावर उदार होत त्यांनी आपल्या साथीदारांचे प्राण वाचवले मात्र ते स्वत: आगीत भस्मसात होऊन शहीद झाले. सॅपर जाधव यांनी देशसेवेसाठी आपले प्राण अर्पण करत जिवापेक्षा आपल्या साथीदारांच्या जीवाला प्राधान्य दिले. त्यामुळे प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने भरून येईल असे शौर्याचे उदाहरण देशासमोर ठेवले आहे. सॅपर प्रकाश जाधव यांची ही कहाणी प्रत्येकाचे डोळे पाणावतील अशी आहे.