जाणून घ्या! राष्ट्रपतीपदाची निवडणूक कशी होते? मतमोजणीचं गणित कसं असतं?

राष्ट्रपतींची निवड नक्की होते कशी? त्यांच्या निवडीचं सूत्र कसं असतं, इतर निवडणुकांप्रमाणेच राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होते का? हे आपण जाणून घेऊयात!

राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपणार आहे. त्यानंतर भारताला नवे राष्ट्रपती प्राप्त होतील. त्यासाठी निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. १५ जून रोजी अधिसूचना जाहीर होणार असून १८ जून रोजी निवडणूक होणार आहे. तर, २१ जून रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. (Know more about How is the presidential election held? What is the formula for counting votes?)

राष्ट्रपतीपदासाठी दावेदार असलेले उमेदवार आता विविध राज्यात जाऊन प्रचार दौरा करू शकतील. पण राष्ट्रपतींची निवड नक्की होते कशी? त्यांच्या निवडीचं सूत्र कसं असतं, इतर निवडणुकांप्रमाणेच राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होते का? हे आपण जाणून घेऊयात!

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी लोकसभा, राज्यसभा, राज्यांच्या विधानसभा, केंद्रशासित दिल्ली आणि पुदुच्चेरी विधानसभांचे सदस्य मतदान करतात.

राष्ट्रपतीपदासाठी किती मतदार आहेत?

विधानसभा – ४१२० आमदार

लोकसभा – ५४३ खासदार

राज्यसभा – २३३ खासदार

म्हणजेच, राष्ट्रपतीपदासाठी भारतात ४८९३ मतदार मतदान करतात. मात्र, राष्ट्रपती नामनिर्देशित १२ खासदार, संसद आणि विधानसभेतील सदस्य आणि विधान परिषदांचे सदस्य या निवडणुकीत मतदान करू शकत नाहीत.

खासदारांचं मूल्यमापन

खासदारांच्या मतांचं मूल्यमापनाचं गणित वेगळं असतं. सर्वात आधी सर्व राज्यांच्या विधानसभेतील आमदारांच्या मतांचं मूल्य काढलं जातं. या मूल्यांचं विभाजन राज्यसभा आणि लोकसभेच्या सदस्यांच्या संख्येसोबत केलं जातं. या भागाकारानंतर जो आकडा येतो तो आकडा खासदारांचं मूल्य असतो.

आमदारांचं मुल्य कसं तपासतात

आमदारांचं मुल्य काढण्याकरता त्या राज्याची लोकसंख्या लक्षात घेतली जाते. त्यानंतर त्या राज्यातील एकूण आमदारांची संख्या लक्षात घेतली जाते. आमदारांचं मुल्य काढण्याकरता राज्याच्या लोकसंख्येला राज्यातील एकूण आमदारांच्या संख्येने भागले जाते. या भागाकारातून जी संख्या येईल त्या संख्येलाही एक हजाराने भागले जाते. यातून जो आकडा येईल, तो आकडा राज्यातील आमदारांचे मुल्य असते. देशभरातील 4120 आमदारांचे एकूण मत मूल्य हे 5,49,495 इतके आहे.

सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टम

या निवडणुकीत हटके पद्धतीने मतदान केलं जातं, ज्याला सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टम म्हटलं जातं. म्हणजेच, मतदार एकच मत देतो, पण ते मत उमेदवारांच्या प्राधान्यानुसार दिलं जातं. म्हणजेच, पहिलं प्राधान्य कोणाला, दुसरं कोणाला, तिसरं कोणाला असं बॅलेट पेपरवर मतदारांकडून सांगितलं जातं. पहिलं प्राधान्य दिलेल्या उमेदवाराला विजेता म्हणून घोषित करणे कठीण असेल तर उमेदवाराच्या खात्यातील मतदाराचे दुसरं प्राधान्य कोणत्या उमेदवाराला आहे हे पाहून ते मत सिंगल वोटप्रमाणे ट्रान्सफर केलं जातं. म्हणून त्याला सिंगल ट्रान्स्फरेबल वोट म्हटलं जातं.

मतांचं गणित कसं असतं?

जास्तीत जास्त मतं ज्या उमेदवाराला मिळतात ते राष्ट्रपती बनतात असा नियम येथे लागू होत नाही. एकूण मतदारांच्या सरासरीनुसार ज्या उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळतात तो उमेदवार राष्ट्रपती बनतो. यंदा राष्ट्रपती निवडणुकीसाठी जे इलेक्टोरल कॉलेज आहे, त्या सदस्यांच्या एकूण मतांचं मूल्य 1098882 आहे. त्यामुळे राष्ट्रपती पदासाठी निवडून येण्यासाठी उमेदवाराला 549441 मतं मिळणे गरजेचं आहे.