कुमार विश्वास या सुप्रसिद्ध कवीची फॉर्च्युनर चोरीला

कुमार विश्वास हे साहित्य विश्वातील लोकप्रिय कवी म्हणून ओळखले जातात. कुमार विश्वास यांची 'कोई दीवाना कहता है, कोई पागल समझता है' ही कविता अत्यंत लोकप्रिय ठरली आहे.

kumar vishwas car stolen from outside his house

सुप्रसिद्ध हिंदी कवी म्हणून ख्यातनाम असलेले ‘कुमार विश्वास’ यांची घराबाहेर उभी असलेली फॉर्च्युनर रात्रीच्या अंधारात चोरीला गेली आहे. सकाळी घराबाहेर कार नसल्याचे समजताच कुमार विश्वास यांनी तडक पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, ही कार रात्री दीडच्या सुमारास चोरीला गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कुमार विश्वास यांच्या घरा शेजारी चौकशी करून तसेच आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमाने पोलिस चोरांचा शोध घेत आहेत.

कोण आहेत कवी ‘कुमार विश्वास’?

कुमार विश्वास हे साहित्य विश्वातील लोकप्रिय कवी म्हणून ओळखले जातात. कुमार विश्वास यांची ‘कोई दीवाना कहता है, कोई पागल समझता है’ ही कविता अत्यंत लोकप्रिय ठरली आहे. साहित्याखेरीज कुमार विश्वास हे सामाजिक मुद्यांवर देखील अनेकदा आपले मत व्यक्त करत असतात. आम आदमी पक्षाच्या सुरूवातीच्या काळात कुमार विश्वास हे सगळ्यात जास्त सक्रिय असलेले नेते म्हणून ओळखले जात असत. पण, राज्यसभेतील जागा न मिळाल्याने यावरून अनेक मतभेद झाले आणि कुमार विश्वासांनी पक्षाला रामराम ठोकला.

अरविंद केजरीवाल यांनी भारतीय सेनेच्या सर्जिकल स्ट्राइक मुद्यावरून प्रश्न उपस्थित केले होते. यामुळे कुमार विश्वास यांनी नाराजी व्यक्त केली होती. आप ने २०१८ साली संजय सिंह, सुशील गुप्ता आणि एनडी गुप्ता यांना राज्यसभेत पाठवले होते. अशा प्रकारे झालेले जागा वाटप न पटल्याने पक्षाशी कुमार विश्वास यांचे अनेक वेळा मतभेद झाले. आप मधून वेगळे होण्यासाठी केवळ हेच कारण नाही तर पक्षाची विचारधारा न पटल्याने कुमार विश्वास यांनी आम आदमी पक्षाला रामराम ठोकला. तेव्हा पासून कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल तसेच मनीष सिसोदिया यांच्याशी राजकीय फारकत घेतली.

अरविंद केजरीवालांचा शपथविधी

अरविंद केजरीवाल सलग तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून १६ फेब्रुवारीला शपथ घेणार आहेत. दिल्ली येथील रामलीला मैदानावर हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे.