Homeदेश-विदेशKumar Vishwas Vs Mohan Bhagwat : 75 वर्षांनी देश जागा झालाय, कुमार...

Kumar Vishwas Vs Mohan Bhagwat : 75 वर्षांनी देश जागा झालाय, कुमार विश्वासांचीही वादात उडी

Subscribe

मंदिरे पाडून मशिदी बांधायला त्यांना कोणी शिकवले? तुम्ही मंदिरे पाडून मशिदी बांधल्या..., मंदिरे सोडून अन्य ठिकाणी मशिदी उभ्या राहिल्या नसत्या का? असा प्रश्न कुमार विश्वास यांनी केला आहे.

(Kumar Vishwas Vs Mohan Bhagwat) लखनऊ : प्राचीन प्रार्थनास्थळांबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्यावरून हिंदूत्ववादी नेत्यांपासून हिंदू धर्मगुरूंनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यात आता प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांनीही उडी घेतली आहे. हा देश 75 वर्षांनी जागा झाला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. (Entry of Kumar Vishwas in Temple Masjid dispute at Sambhal)

सरसंघचालक मोहन भागवत यांनी 19 डिसेंबर रोजी पुण्यातील सहजीवन व्याख्यानमालेत बोलताना, देशभरात मंदिर-मशीद वादाने पुन्हा डोके वर काढल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीनंतर काही लोकांना असे वाटू लागले आहे की, ते असे मुद्दे उपस्थित करून ‘हिंदूंचे नेते’ होऊ शकतात, असे सांगतानाच भागवत यांनी, सर्वसमावेशक समाजाचे समर्थन केले. आपण एकोप्याने राहू शकतो, हा संदेश भारताने देण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले होते. उत्तर प्रदेशच्या संभल येथील जामा मशिदीवरून सध्या वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सरसंघचालकांनी केलेल्या या वक्तव्याला महत्त्व आले आहे.

मोहन भागवत यांच्या वक्तव्यावरून हिंदू धर्माचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राजकीय गरजेनुसार मोहन भागवत आपल्या सोयीची वक्तव्ये करत असतात आणि काहीही बोलतात. जेव्हा मतांची गरज होती, तेव्हा ते फक्त मंदिरांबद्दल बोलायचे आणि आता मंदिरे शोधू नका असे सांगत आहेत, असे ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटले आहे. तर, तुळशीपीठाचे प्रमुख आराध्य दैवत रामभद्राचार्य यांनीही, मोहन भागवत यांच्या मंदिरांबाबतच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचे सांगितले.

उत्तर प्रदेशच्या संभलमधील जामा मशीद ही हरिहर मंदिराच्या जागी उभी करण्यात आल्याचा दावा 19 नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ वकील विष्णू शंकर जैन यांनी आठ जणांच्या वतीने दिवाणी न्यायाधीशांकडे केला होता. त्यावर त्याच दिवशी रमेशसिंग राघव यांची एडव्होकेट कमिशनर म्हणून नियुक्ती करून संबंधित जागेचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले. तेव्हापासून यावर वाद निर्माण झाला आहे.

तर, आता या वादात कुमार विश्वास यांनी उडी घेतली आहे. एका कार्यक्रमात त्यांनी याबाबत टिप्पणी केली आहे. मंदिरे पाडून मशिदी बांधायला त्यांना (मुस्लिम आक्रमणकारी) कोणी शिकवले? तुम्ही मंदिरे पाडून मशिदी बांधल्या…, मंदिरे सोडून अन्य ठिकाणी मशिदी उभ्या राहिल्या नसत्या का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आता 75 वर्षांनंतर हा देश जागा झाला आहे. आता कोणाचेही सरकार आले तरी हा देश निद्राधीन होणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. (Kumar Vishwas Vs Mohan Bhagwat : Entry of Kumar Vishwas in Temple Masjid dispute at Sambhal)

हेही वाचा – Kumar Vishwas about Kareena Kapoor : कुमार विश्वास यांच्या निशाण्यावर करिना कपूर, म्हणाले…

Manoj Joshi
Manoj Joshi
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.