घरCORONA UPDATEसूरतमध्ये मजुरांच्या संतापाचा उद्रेक, पोलिसांवरच हल्ला; गाड्यांची मोडतोड!

सूरतमध्ये मजुरांच्या संतापाचा उद्रेक, पोलिसांवरच हल्ला; गाड्यांची मोडतोड!

Subscribe

लॉकडाऊनमुळे देशभरात ठिकठिकाणी अडकून पडलेल्या मजुरांना आपापल्या गावी जाण्यासाठी रेल्वेची मदत घेऊन व्यवस्था लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी देखील बरीच मोठी प्रक्रिया पार पाडावी लागत आहे. शिवाय, देशाच्या सर्वच भागातून या ट्रेन सोडल्या जात नसल्यामुळे अशा अनेक ठिकाणी मजुरांमध्ये संतापाची भावना दिसून येत आहे. असाच काहीसा प्रकार आज दुपारी गुजरातच्या सूरतमध्ये पाहायला मिळाला. सूरतमध्ये गेल्या दीड महिन्यापासून अडकून पडलेल्या मजुरांच्या संतापाचा उद्रेक झाला. या मजुरांनी थेट पोलिसांवरच हल्ला केल्याचा प्रकार सूरतमध्ये घडला. या प्रकारानंतर पोलिसांनाही जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला. उत्तरादाखल पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या देखील फोडाव्या लागल्या.

- Advertisement -

सूरतमधल्या पलसाना आणि पालनपूर जकातनाक्यावर हा प्रकार घडला. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून हे मजूर सूरतमध्येच अडकून पडले होते. सूरतमध्ये मोठ्या प्रमाणावर हातकामावर आधारित उद्योग आहेत. त्यामुळे देशाच्या इतर भागातून मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग इथे हजर होता. १० एप्रिल रोजी देखील अशाच प्रकारे सूरतमध्ये मजूर वर्गाने मोठ्या संख्येने रस्त्यावर जमा होत आपला निषेध व्यक्त केला होता. यातले बहुतांश मजूर हे उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. मात्र, अनेक दिवस थांबूनही आपल्या गावी परत जाण्याची सोय होत नाही हे पाहून हे मजूर अखेर रस्त्यावर आले आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.

सुरुवातीला या गोंधळाचं स्वरूप आरडाओरड्याचं होतं. पण अखेर त्याचं रुपांतर पोलिसांवरच आक्रमक होण्यात झालं. गाड्यांची मोडतोड देखील करण्यात आली. त्यामुळे शेवटी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. तसेच, सौम्य लाठीमार देखील करावा लागला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -