घरदेश-विदेशदेशातील 'या' राज्यात Corona Vaccine चा तुटवडा; अर्ध्याहून अधिक लसीकरण केंद्र बंद

देशातील ‘या’ राज्यात Corona Vaccine चा तुटवडा; अर्ध्याहून अधिक लसीकरण केंद्र बंद

Subscribe

देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतात मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. लसीकरणाच्या बाबतीत अमेरिकेला मागे टाकत भारत हा देश वेगवान लसीकरण करणारा देश ठरला आहे. बुधवारी सकाळपर्यंत २४ तासात ३३ लाख कोरोना लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत देशात साधारण ८.७ कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात आल्याची दिलासादायक बाब असली तरी दूसरीकडे वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान, काही राज्यात कोरोना लसीकरणाचा तुटवडा निर्माण झाल्याचा मुद्दा देखील उपस्थितीत होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राकडून कोरोना लसीकरणाचा पुरवठा वाढवण्याची मागणी देखील केली जात आहे तर अर्ध्याहून अधिक लसीकरण केंद्र बंद झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

दरम्याम, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी असे सांगितले की, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, लसीकरण केंद्रावर लसींचा तुटवडा निर्माण होत असून आवश्यक तेवढा कोरोना लसींचा साठा उपलब्ध नाही. राज्यात कित्येक लसीकरण केंद्रावर कोरोनाची लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना लस न घेताच परत जावे लागत आहे. पुरेसा कोरोना लसींचा साठा नसल्याने राज्यातील कित्येक लसीकरण केंद्र बंद करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात कोरोना लसींचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी राज्याकडून केंद्राकडे करण्यात आल्याचे देखील राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. तर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी केवळ १ लाख ७६ हजार इतकाच कोरोना लसींचा साठा असून अधिक कोरोना लसींची आवश्यकता असल्याचे सांगितले.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्यानंतर वाराणसीमध्ये देखील कोरोना लसीकरणाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असल्याने ६६ सरकारी लसीकरण केंद्रांपैकी बुधवारी फक्त २५ लसीकरण केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. तर उर्वरित लसीकरण केंद्रांना टाळे असल्याचे दिसून आले. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना कोरोना लसींची कमतरता कधी भरून निघेल याची माहिती तेथील आरोग्य विभागाला देखील नसल्याचे दिसतेय. वाराणसी शहराच्या चौकाघाट येथे असणाऱ्या जनपद लसीकरण भंडार केंद्र बंद झाल्याने चौकाघाट राजकीय आयुर्वेदिक रुग्णालय आणि ढेलवरिया आरोग्य केंद्रावर देखील कोरोनाच्या लसीकरण मोहीमेचे काम ठप्प झाल्याची माहिती समोर येतेय.

यासह आंध्रप्रदेश राज्याने देखील एक कोटी कोरोना लसींची आवश्यकता असून कोरोना लसीची मागणी करणारे पत्र केंद्र सरकारला लिहिले आहे. मिळालेल्या माहिती नुसार, आंध्रप्रदेश राज्यात साधारण ३.७ लाख कोरोनाचे डोस उरले आहेत. तर राज्यात प्रत्येक दिवशी १.३ लाख डोस नागरिकांना दिले जात आहे. त्यामुळे लवकरच कोरोनाच्या लसींचा तुटवडा निर्माण होणार असल्याने राज्याकडून आंध्रप्रदेश राज्याचे मुख्य सचिव आदित्यनाथ दास यांनी केंद्राला पत्र लिहून १ कोटी डोस पुरवण्याची मागणी केली आली आहे. यासह ओडीसा राज्याने देखील केंद्राकडून लवकरात लवकर २५ लाख कोरोना लसीचे डोस कोव्हिशील्ड लस पुरवण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

तसेच, या राज्यांसह झारखंडमध्ये देखील कोरोना लसींचा तुटवडा भासत आहे. झारखंडमध्ये कोरोना लसीकरण मोहीमेस गती मिळावी, यासाठी ४ ते १४ एप्रिलदरम्यान विशेष अभियान सुरू करण्यात आहे आहे. मात्र कोरोना लसींच्या कमतरतेमुळे या लसीकरणाच्या विशेष अभियानाला ब्रेक लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी काही लसीकरण केंद्रावर लसीकरण थांबवण्यात आले आहे तर राज्यात दोन दिवस पुरेल इतकाच कोरोना लसींचा साठा असल्याने तो देखील संपण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे देशातील कित्येक राज्यात कोरोना लसीकरणाचा तुटवडा निर्माण झाल्यास कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -