घरदेश-विदेशशेतकऱ्यांना चिरडणं ही भाजपची, पंतप्रधान मोदींची भूमिका आहे का?; राऊतांचा सवाल

शेतकऱ्यांना चिरडणं ही भाजपची, पंतप्रधान मोदींची भूमिका आहे का?; राऊतांचा सवाल

Subscribe

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारावरुन शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांना चिरडणं ही भाजपची, पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका आहे. का? असा परखड सवाल संजय राऊत यांनी केला. प्रियंका गांधी यांना लखीमपूर खेरी येथे जाण्यास रोखण्यावरुन देखील राऊत यांनी भाजपवर टीका केली.

बलात्काराच्या घटना, शेतकऱअयांवर अन्याय झाला तर विरोधक त्यांचे अश्रू पुसण्यासाठी जातात. मात्र, विरोधकांना तिथे जाण्यापासून रोखलं जातं. विरोधकांना रोखण्यासाठी कायदा आणि सुव्यस्थेचा मुद्दा पुढे करतात. कालच्या घटनेनं शेतकऱ्यांच्या मनात राग आहे. लोकांना थांबवलं तर तो राग वाढेल. लोकांना समजतंय काय होत आहे. शेतकऱ्यांना चिरडणं, शेतकऱ्यांच्या विरोधात या प्रकारे कारवाई करणं, शेतकऱ्यांच्या बाजूने जे बोलतात त्यांचा आवाज दाबणं हे भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अधिकृत भूमिका आहे का? असेल तर सांगा, असं म्हणत देशातील अन्नदात्यांची हत्या करत आहेत हे ठीक नाही आहे, असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

गुंडांना आणून शेतकऱ्यांचं आंदोलन संपवण्याचा प्रयत्न करत आहात का? असं असेल तर करुन दाखवा, मग बघा काय होतं ते, असं आव्हान राऊत यांनी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना दिलं.

नेमकं प्रकरण काय आहे?

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य एका कुश्तीच्या कार्यक्रमासाठी लखीमपूरच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आणि काही कार्यकर्ते दोन ते तीन गाड्यातून गेले. ज्या मार्गावर ते होते त्याच मार्गावर कृषी कायद्यांच्याविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु होतं. या दरम्यान, भाजप कार्यकर्ते आणि आंदोलक यांच्यात काही तरी बाचाबाची झाली आणि मग गृहराज्य मंत्र्यांच्या मुलानं आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावरच थेट गाडी घातल्याचा आरोप करण्यात आला आहे.

- Advertisement -

केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांचं मूळ गाव बनवीरपूर गावात ही घटना घडली. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे एका कार्यक्रमासाठी गावात येणार होते. त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी जमलेल्या शेतकरी आंदोलकांवर दोन मोटारी घुसवल्यानंतर हिंसाचार घडला. आंदोलकांनी या दोन मोटारींना आग लावल्याचाही आरोप करण्यात येत आहे. या घटनेत चार शेतकरी आणि इतर चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनास्थळी एका मोटारीत आशिष मिश्रा हा मंत्रीपुत्र होता, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मात्र मंत्रीमहोदयांनी हा आरोप फेटाळला आहे. या घटनेत भाजपच्या तीन कार्यकर्त्यांचा आणि एका वाहन चालकाचा मृत्यू झाला आहे, असं मिश्रा यांनी सांगितलं.

 

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -