Lakhimpur Kheri Case: केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्राला जामीन मंजूर

Lakhimpur Kheri violence Ashish Mishra son of MoS Home Ajay Mishra Teni gets bail From Allahabad HC
लखीमपूर हिंसाचार: केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्राला हायकोर्टाकडून जामीन मंजूर

लखीमपूर हिंसाचार प्रकरणी गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने आशिष मिश्राचा जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणाची सुनावणी यापूर्वीच पूर्ण झाली होती. मात्र न्यायालयाने निकाल देताना आता जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आशिष मिश्रा उद्यापर्यंत तुरुंगाबाहेर येण्याची आशा आहे.

उत्तर प्रदेश एसआयटीने नुकतेच लखीमपूर हिंसाचार प्रकरणात मुख्य आरोपींविरोधात आरोप पत्र दाखल केले होते. 5000 पानांच्या त्या आरोपपत्रात एसआयटीने केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला मुख्य आरोपी म्हणून घोषित केले होते. एवढेच नाही तर आशिष मिश्रा एसआयटीच्या माहितीनुसार घटनास्थळी उपस्थित होता.

एसआयटीने आपल्या तपासात लखीमपूर हिंसाचारात आशिष मिश्राने शस्त्रांनी गोळीबार केल्याचीही पुष्टी केली होती. आरोपपत्रात एसआयटीने आशिष मिश्राच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार करण्यात आल्याचे सांगत, आशिष मिश्रा आणि अंकित दास यांच्या परवानाधारक शस्त्रांमधून गोळीबार केल्याचे सांगितेल आहे. मात्र आशिष मिश्राने त्याच्या रिव्हॉल्व्हरमधून एका वर्षात एकदाही फायरिंग झाली नाही असा दावा केला. परंतु पोलिसांनी बॅलेस्टिक रिपोर्टच्या आधारेवर फायरिंग झाल्याची पुष्टी केली आहे.

3 ऑक्टोबर लखीमपूरमध्ये झाला होता हिंसाचार

लखीमपूरच्या टिकुनिया येथे 3 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या हिंसाचारात 8 लोकांचा मृत्यू झाला. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा उर्फ मोनू याने आपल्या जीपने शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप आहे. यानंतर संतप्त जमावाने आशिषच्या चालकासह चार जणांची हत्या केली. लखीमपूर हिंसाचाराच्या घटनेवरून विरोधकांकडून केंद्र सरकारवर सातत्याने निशाणा साधला जात आहे. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणीही विरोधकांकडून करण्यात येत आहे. मात्र आता निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आशिष मिश्राला जामीन मिळाल्याने विरोधक आता या मुद्द्याचे कसे व्यक्त होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


New Guidelines: आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी नव्या गाईडलाईन्स, होम-क्वारंटाईनचे नियम हटवले