Lakhimpur Kheri Violence: काँग्रेसने घेतली राष्ट्रपतींची भेट, सुप्रीम कोर्टाच्या न्यायमुर्तींकडून चौकशीची मागणी

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रांविरोधात काँग्रेसची राष्ट्रपतींकडे तक्रार

Congress delegation led by rahul gandhi meet President ramnath kovind
काँग्रेसने घेतली राष्ट्रपतींची भेट, सुप्रीम कोर्टाच्या न्यायमुर्तींकडून चौकशीची मागणी

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी घटनेवरुन काँग्रेस आक्रमक झाली असून आज खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसने निवेदन देत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली. तसंच, या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान दोन न्यायमुर्तींकडून चौकशी व्हायला हवी, अशी देखील मागणी करण्यात आली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. ज्यांनी शेतकऱ्यांना मारलं आहे, त्याला शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी पीडित परिवाराची आहे, असं राहुल गांधी म्हणाले. तसंच, पुढे बोलताना त्यांनी ज्या व्यक्तीने हत्या केली आहे, त्याचे वडील हे देशाचे गृहराज्य मंत्री आहेत. ते जो पर्यंत त्या पदावर आहेत तोपर्यंत न्याय मिळणार नाही. हे आम्ही राष्ट्रपतींना सांगितलं, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.

प्रियंका गांधी यांनी आरोपीचे पिता केंद्रीय गृहराज्यमंत्रिपदी आहेत. जो पर्यंत त्यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत न्याय मिळणार नाही. आरोपीचे पिता केंद्रीय गृहराज्यमंत्रिपदी असल्यानं प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणं अशक्य आहे, असं प्रियंका गांधी म्हणाल्या.

काँग्रेसने केल्या दोन मोठ्या मागण्या

राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, आम्ही लखीमपूर खेरी हिंसाचारासंदर्भातील सर्व माहिती राष्ट्रपतींना दिली. आम्ही त्यांच्यासमोर दोन मागण्या ठेवल्या आहेत. विद्यमान न्यायाधीशांमार्फत निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. दुसरी मागणी म्हणजे गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी एकतर राजीनामा द्यावा किंवा त्यांना बडतर्फ करावं. तरच हिंसाचारात आपला जीव गमावलेल्या शेतकरी कुटुंबांना न्याय मिळेल.

राहुल गांधी यांच्यासोबत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेते एके अँटनी, गुलाम नबी आझाद, लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि संघटनेचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल हे नेते होते.