Lakhimpur Violence: तीन भरधाव गाड्यांनी वडिलांना चिरडले, शेतकऱ्याच्या मुलाने सांगितला प्रसंग

Lakhimpur kheri

लखीमपुर हिंसेनंतर संपुर्ण गावात शोककळा पसरली आहे. मृतांच्या परिवाराचा आक्रोश एेकायला मिळत आहे. तर दुसरीकडे नातेवाईकांची आणि राजकीय पक्षांची गर्दी, शेतकरी नेत्यांची वर्दळ आणि मोठा पोलिस बंदोबस्त असेच सध्याचे गावातले चित्र आहे. पोलिसांकडून अनेकांना गावात प्रवेशासाठी मज्जावही करण्यात येत आहे. त्यातच घटनेत आपले वडिल गमावलेल्या मुलाची प्रतिक्रिया समोर आली आहे. नानपारा येथे राहणाऱ्या दलजीत सिंह या मृत शेतकऱ्याच्या मुलाने राजदीपने आपल्या वडिलांवर ओढावलेल्या मृत्यूचा घटनाक्रम सांगितला आहे.

माझ्या वडिलांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच संघर्ष केला होता. शनिवारी सकाळी ते लखीमपुर येथे गेले होते. त्याठिकाणीच वडिलांची हत्या करण्यात आली. राजदीपने सांगितले की एकापाठोपाठ एक अशा तीन गाड्या आल्या आणि अनेकांना चिरडत निघून गेल्या.

मुलाच्या चेहऱ्यावर धारधार वस्त्राने वार

लखीमपुर येथील शिवपुरीचे रहिवासी असलेले विजय मिश्र यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा शुभम मिश्रच्या चेहऱ्यावर धारधार हत्याराने वार केल्याच्या जखमा होत्या. माझा मुलगा शिवपुरी वॉर्डचा बीजेपीचा मंडल अध्यक्ष होता. मी तर सगळच गमावले आहे, सरकारने दोषींना फाशीची शिक्षा द्यावी अशीही मागणी त्यांनी केली आहे.

पोलिस, प्रशासनाकडूनही चौकशी

दलजित सिंह हे बंजारन टांडाचे शेतकरी होते. गावातील लोकांची जमीन कसायला घेऊन ते शेती करायचे. या घटनेनंतर अपर पोलिस अधिक्षक अशोक कुमार सिंह यांनी बंजारन टांडा गावातील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. दलजीत यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्याची माहिती कुटूंबीयांनी दिली आहे. प्रशासनाकडूनही दलजीत यांच्या कुटूंबीयांना भेटायला येणाऱ्यांवर नजर ठेवण्यात येत आहे. रविवारी झालेल्या हिंसेत अनेकांना प्राण गमवावे लागले. तर काही गाड्याही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत.


हेही वाचा – Lakhimpur Kheri Violence: महाराष्ट्रात घडलं असतं तर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने तांडव केला असता – राऊत