Lakhimpur Kheri Violence : जो पर्यंत गृह राज्यमंत्री राजीनामा देत नाहीत तो पर्यंत लढत राहणार – प्रियंका गांधी

Priyanka Gandhi
जो पर्यंत गृह राज्यमंत्री राजीनामा देत नाहीत तो पर्यंत लढत राहणार - प्रियंका गांधी

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आज वाराणसीमध्ये किसान न्याय रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी वाराणसीचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. तसंच लखीमपूर खेरी प्रकरणावरुन जो पर्यंत गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत लढत राहू, असं स्पष्ट केलं.

प्रियंका गांधी यांच्या वाराणसीमधील किसान न्याय रॅलीला जनतेने भरभरुन प्रतिसाद दिला. यावेळी प्रियंका गांधी यांनी महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ, सिलेंडरच्या वाढलेल्या किंमती यावरुन केंद्रातीलम मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची किंमत भेटत नाही आहे. तुमच्या मुलांना नोकऱ्या मिळत नाही आहेत. मग सत्य काय आहे आणि लोक हे सत्य बोलण्यास का घाबरतात? तुम्हाला कशाची भीती आहे? काय होईल? असा सवाल करत जमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उर्जा निर्माण करण्याचं काम प्रियंका गांधी यांनी केले.

पुढे बोलतामना प्रियंका गांधी यांनी हे केवळ निवडणुकीसाठी नाही आहे, देशाचा प्रश्न आहे. हा देश भाजप अधिकारी, मंत्री, पंतप्रधान यांची संपत्ती नाही, हा देश तुमचा आहे. या देशाला कोण वाचवणार? असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं. जर तुम्ही जागरूक होणार नसाल. तुम्ही त्यांच्या राजकारणात अडकलात तर तुम्ही ना स्वतःला वाचवू शकाल ना देशाला. तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही या देशाचा आत्मा आहात. तुम्ही सर्व नेत्यांना स्टेजवर बसवले आहे. जे तुम्हाला आंदोलक म्हणतात, तुम्हाला दहशतवादी म्हणतात, त्यांना न्याय देण्यास भाग पाडा. काँग्रेसचे कार्यकर्ते कुणाला घाबरत नाहीत. आम्हाला तुरुंगात टाका, आम्हाला ठार मारा, आम्ही लढत राहू, जोपर्यंत गृह राज्यमंत्री राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आम्ही हलणार नाही, असा इशारा प्रियंका गांधी यांनी दिला.

आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत, आम्ही देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आहे. आम्हाला कोणीही शांत करू शकत नाही. कोणीही थांबू शकत नाही. हे सरकार आल्यापासून, या गेल्या ७ वर्षांत तुमच्या जीवनात काही प्रगती झाली आहे का? विकास तुमच्या दारात आला आहे का? तुम्हाला दिलेली आश्वासने पाळली गेली आहेत का? आणि प्रामाणिकपणे उत्तर द्या. जर तुमचे उत्तर नाही असेल तर माझ्या पाठीशी उभे राहा आणि लढा. बदल आणा. आपला देश बदला कारण बदल होईपर्यंत मी थांबणार नाही.