Lakhimpur Violence : देश हुकूमशाहीत, परवानगी नाकारली तरी लखीमपूरला जाणार – राहुल गांधी

rahul gandhi
देश हुकूमशाहीत, परवानगी नाकारली तरी लखीमपूरला जाणार - राहुल गांधी

लखीमपूर खेरी येथील घटनेवरुन काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. देश हुकूमशाहीत आहे, असा हल्लाबोल केंद्रावर केला. याशिवाय, परवानगी नाकारली तरी लखीमपूरला जाणार, असं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं आहे. लखीमपूर खेरी येथे चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाल्यानंतर राजकारण तापलं आहे.

राहुल गांधी यांनी आज छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांच्यासोबत लखीमपूरला जाण्याची घोषणा केली आहे, परंतु उत्तर प्रदेश प्रशासनाने त्यांना परवानगी दिलेली नाही. त्याचवेळी, यूपीला जाण्यापूर्वी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी योगी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

पूर्वी भारतात लोकशाही होती परंतु आता येथे हुकूमशाही आहे. केवळ काँग्रेसचे नेते यूपीमध्ये जाऊ शकत नाहीत, त्यांना रोखलं जात आहे. इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही यूपीला जाण्याची परवानगी नाही. काही काळापासून भारतातील शेतकऱ्यांवर सरकारकडून हल्ले होत आहेत आणि शेतकऱ्यांना जीपने चिरडलं जातंय. आतापर्यंत मंत्र्यावर कारवाई का केली गेली नाही. यूपीमध्ये शेतकऱ्यांची हत्या केली जात आहे, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.

त्याचबरोबर प्रियंका गांधींच्या अटकेवर देखील राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली. प्रियंकाला अटक करण्यात आली आहे, पण इथे मोठा मुद्दा शेतकऱ्यांचा आहे. आमचा पक्ष शेतकऱ्यांच्या हक्कांबद्दल बोलेल, असं राहुल गांधी म्हणाले.

विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप सत्ताधारी करत आहेत यावर राहुल गांधी यांनी भाष्य केलं. आमचं काम सरकारवर दबाव निर्माण करणं आहे. आम्ही हाथरसमध्ये दबाव निर्माण केला, त्यानंतर कारवाई करण्यात आली. आम्ही हाथरसला गेलो नसतो तर गुन्हेगार पळून गेले असते. दबाव निर्माण होऊ नये म्हणून सरकार आम्हाला या प्रकरणापासून दूर ठेवत आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

यूपीमध्ये गुन्हेगार मुक्तपणे फिरतात

यूपीमध्ये गुन्हेगार मुक्तपणे फिरत आहेत. तेथे, खून केल्यानंतर, बलात्कार केल्यानंतर, आरोपी मुक्त फिरतात, पीडित तुरुंगात आहेत किंवा त्यांची हत्या केली जाते.