सत्तेचा दुरुपयोग करुन विरोधकांचा गळा दाबणे योग्य नाही, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी जी हिम्मत दाखवली ती विरोधी पक्षांना ऊर्जा देऊन जाईल.

Lakhimpur violence sanjay raut slams bjp on farmer protest priyanka gandhi arrest
सत्तेचा दुरुपयोग करुन विरोधकांचा गळा दाबणे योग्य नाही, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

शिवसेना खासदार संजय राऊत दिल्लीत काँग्रेस माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्या भेटीला पोहचले आहेत. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्यात ८ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी गेल्या होत्या परंतु त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे राहुल गांधींना भेटणे गरजेचे असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये लोकशाहीच्या मुल्यांचे उल्लंघन करण्यात येत आहे. कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्याना अडवण्यात येण ही लोकशाहीमध्ये लाजीरवाणी बाब असून सत्तेचा दुरुपयोग करुन विरोधकांचा गळा दाबणे योग्य नाही असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत राहुल गांधी यांच्या भेटीपुर्वी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, देशात होणाऱ्या घटनांवर चर्चा झाली पाहिजे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जात असताना त्यांना उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे राहुल गांधींची भेट घेतली पाहिजे. उत्तर प्रदेशमध्ये हिंसाचारात ८ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी दुसऱ्या राज्यातील मुख्यमंत्री जात असताना त्यांना अडवण्यात येत असून ही लोकशाहीमध्ये लाजीरवाणे आहे. दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा सन्मान करा ते वेगळ्या पक्षाचे असू शकतात. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना रोखण्यात आले, छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना रोखण्यात आले त्यांनी विमानतळावर धरणे आंदोलनही केले. हे कोणत्या राज्यात आपण जगत आहोत. आझादी का अमृत महोत्सव हीच आझादी आहे का? असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी जी हिम्मत दाखवली ती विरोधी पक्षांना ऊर्जा देऊन जाईल. शेतकऱ्यांवरील हल्ल्याच्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार आहे. परंतु सत्तेतील सगळे लोकं मिळून ज्याप्रकारे सत्तेचा दुरुपयोग करुन विरोधकांचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत आहेत हे योग्य नाही असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

कायदा सर्वांसाठी सारखाच आहे तर प्रियंका गांधी तुरुंगात आहे आणि ज्यांनी गुन्हा केला ते बाहेर फिरत आहेत असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : भाजप सरकार सत्तेचा वापर करुन शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे – शरद पवार