ज्या सरन्यायाधीशांसमोर पहिल्यांदा युक्तिवाद केला, त्यांच्याच मुलाची लळित यांनी केली शिफारस

UDAY LALIT

नवी दिल्ली : भारताचे 49वे सरन्यायाधीश उदय लळित काल सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सन्मानार्थ सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनतर्फे निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यात निवृत्त सरन्यायाधीश उदय लळीत यांनी विद्यमान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि त्यांचे वडील माजी सरन्यायाधीश यशवंत चंद्रचूड यांच्याबद्दलची आठवण सांगितली.

माजी सरन्यायाधीश उदय लळित यांनी सर्वोच्च न्यायालयातील प्रॅक्टिसबद्दल माहिती दिली. मी जवळपास 28 वर्षं सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली. तत्कालीन सरन्यायाधीशांसमोर एका प्रकरणासंदर्भात मी आलो होतो आणि ती माझी सर्वोच्च न्यायालयातील पहिली हजेरी होती. त्यावेळी सरन्यायाधीश दुसरे कोणी नसून न्यायमूर्ती यशवंत विष्णू चंद्रचूड होते, अशी आठवण त्यांनी सांगितली. न्यायमूर्ती उदय लळित हे भारताचे 49वे सरन्यायाधीश होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून ज्या सहा ज्येष्ठ वकिलांना पदोन्नती दिली, त्यापैकी ते एक होते.

योगायोगाने माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून तत्कालीन सरन्यायाधीश यशवंत चंद्रचूड यांचे पुत्र न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली. यशवंत विष्णू चंद्रचूड हे 1978 ते 1985 या कालावधीत भारताचे 16वे सरन्यायाधीश होते. तर, भारताचे 50वे सरन्यायाधीश म्हणून धनंजय चंद्रचूड यांनी आज शपथ घेतली.

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील असलेले त्यांचे वडील उमेश आर. लळित यांच्याबद्दल सरन्यायाधीश म्हणाले, “माझ्या वडिलांचा न्यायाधीश म्हणून केवळ दोन वर्षांचा कार्यकाळ होता. त्यांचा कार्यकाळ संपणार आहे, असे जेव्हा समजले तेव्हा, मी न्यायालयात गेलो. मी माझ्या वडिलांना कधीच न्यायाधीश म्हणून पाहिले नव्हते किंवा त्यांच्या शपथविधीला देखील मी उपस्थित नव्हतो. त्यांच्या कामकाजाच्या अखेरच्या दिवशी, मी कोर्टरूम वातावरण पाहिले आणि मला येथेच राहायचे आहे, असे ठरवले, असे त्यांनी सांगितले.

या व्यवसायाने मला सर्व काही दिले आहे. दिल्लीला आल्यावर मनात स्वप्ने होती, मात्र स्पष्ट चित्र नव्हते. पण सुमारे 28 वर्षे मी वकील म्हणून आणि जवळपास आठ वर्षे खंडपीठावर होतो, अशा 37 वर्षांनंतर म्हणू शकतो की, मी आयुष्यात काहीतरी करू शकलो, असे माजी सरन्यायाधीश उदय लळित म्हणाले.

पायऱ्यांवर नतमस्तक

अखेरच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात माजी सरन्यायाधीशांनी कार्यालय गाठले. तिथे पायऱ्यांवर ते आधी नतमस्तक झाले आणि नंतर ते आत गेले. त्यांच्यासमवेत पत्नी आणि सून होती. त्यांनी कुटुंबासह कॅम्पसला भेट दिली. नंतर कार्यालयातून रामाची मूर्ती सोबत घेऊन ते घरी गेले. माजी सरन्यायाधीशांनी कार्यालयातील सपोर्ट स्टाफ आणि इतरांचे आभार मानले