बिहार : बिहारच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री नितीश कुमार हे सर्वांसाठी चर्चेचा विषय बनले आहेत. नितीश कुमार कधीच कोणासोबत कायमस्वरुपी राहात नाही, उलट ते कोणाला पाठिंबा देतील, हे सुद्धा सांगता येत नाही. पण आता नितीश कुमार एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीत राहणार की इंडि आघाडीत परतणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. ज्या चर्चेला बिहारच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय जनता दलचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांनी केलेल्या विधानामुळे खतपाणी मिळाले आहे. नितीश कुमारांसाठी आमचे दरवाजे नेहमीच खुले आहेत, असे विधान लालू प्रसाद यादव यांनी केले आहे. (Lalu Prasad Yadav Indicative Statement About Nitish Kumar)
राजदचे नेते लालू प्रसाद यांनी एका एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये नितीश कुमार यादवांबाबत सूचक विधान केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवेळी “आपलं महानगर – माय महानगर डॉट कॉम”चे संपादक संजय सावंत यांनी ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली होती. यावेळी आदित्य ठाकरे यांनी जदयूचे नितीश कुमार पुढच्या तीन-चार महिन्यात आमचे मित्र बनतील हे भाजपाला कळणारदेखील नाही, असा एक मोठा गौप्यस्फोट केला होता. आदित्य ठाकरे यांनी त्यावेळी केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. पण आता बिहारच्या राजकारणातील प्रमुख नेते लालू प्रसाद यादव यांनी नितीश कुमारांसाठी त्यांचे दरवाजे खुले असल्याचे म्हटल्यानंतर नितीश कुमार खरंच इंडि आघाडीत जाणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा… Delhi Police Report : भागवत कराडांसह 30 व्हीआयपींची सुरक्षा काढणार? ऑडिटचा निष्कर्ष
एका मुलाखतीत लालू प्रसाद यादव म्हणाले की, आमचे दरवाजे नितीश कुमार यांच्यासाठी खुले आहेत. नितीश कुमार यांनी सोबत येऊन काम करावे. जर नितीश कुमार यांना सोबत यायचे असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करू. नितीश कुमार यांनी आमच्यासोबत यावे आणि मिळून काम करावे. त्यात कुठलीही अडचण येणार नाही. तर काही दिवसांपूर्वी तेजस्वी यादव म्हणाले होते की, मुख्यमंत्री नितीश कुमार आता थकले आहेत. त्यांच्यासाठी इंडि आघाडीचे दरवाजे बंद झाले आहेत. मात्र, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबाबत जो काही निर्णय घेतला जाईल, तो पक्ष हायकमांड घेईल. पण या बिहारच्या राजकारणातील या दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबाबत केलेल्या सूचक विधानामुळे एनडीएच्या गोटात खळबळ उडाली आहे.