लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत वाढ; मुलींच्या घरी ईडीची छापेमारी

लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. कारण आता ईडीकडून त्यांच्या मुलींच्या घरी आणि जवळच्या नातेवाईकांच्या घरी छापेमारी करण्यात आली आहे. या छाप्यात अनेक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. तर सीबीआयने लालू प्रसाद यादव यांचा मुलगा आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे.

Lalu Prasad Yadav's troubles increase

नोकरीच्या बदल्यात जमीन या घोटाळ्याप्रकरणी ईडीने शुक्रवारी दिल्ली-एनसीआर, मुंबई, बिहार, रांचीसह 24 ठिकाणी छापे टाकले. लालू प्रसाद यादव यांच्या मुली आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर हा छापा टाकण्यात आला आहे. त्यामुळे नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळ्यात लालू यादव यांच्या अडचणी सध्या कमी होत नसल्याचेच दिसून येत आहे. १४ तासांपेक्षा अधिक वेळ ईडीकडून हा तपास करण्यात आला. या छापेमारीमध्ये ईडीच्या पथकाने सोने, दागिने, रोख रक्कम आणि विदेशी चलनही जप्त केले आहे. दरम्यान, सीबीआयने लालू यादव यांचा मुलगा आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनाही जमीन घोटाळ्याप्रकरणी समन्स पाठवले आहे. सीबीआयने तेजस्वी यादव यांना चौकशीसाठी देखील बोलावले आहे.

ईडीच्या छापेमारीमध्ये काय सापडले?
ईडीच्या छाप्यादरम्यान लालू यादव यांच्या मुली आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरातून ५४० ग्रॅम सोन्याचे नाणे, १.५ किलोचे दागिने, ५३ लाख रुपये रोख आणि ९०० अमेरिकन डॉलर्ससह काही विदेशी चलनही सापडले आहे. लालू प्रसाद यादव यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे आरजेडीचे माजी आमदार अबू दुजाना यांच्या निवासस्थानावर आणि कार्यालयावरही ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे.

याबाबत बोलताना अबू दुजाना म्हणाले की, आमची कोणत्या प्रकरणात चौकशी करण्यात येत आहे हे आम्हाला माहिती नाही. अदानी आणि अंबानी यांना त्यांनी केलेल्या मोठ्या घोटाळ्यांबाबत विचारले पाहिजे. मात्र तसे न करता आमच्यासारख्यांना त्रास दिला जात आहे. आम्ही लालू यादव यांचे शिपाई असून आमचा छळ करण्यात येत आहे. माझ्या इथे काही सापडले नसून ते रिकाम्या हाताने तिथून गेले असल्याची माहिती अबू दुजाना यांच्याकडून देण्यात आली आहे.

भाजपने दिले प्रत्युत्तर
दरम्यान, लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर ईडीकडून करण्यात आलेल्या छापेमारीबाबत भाजपने लालू प्रसाद यादव यांच्यावर हल्लाबोल केला आहे. याबद्दल बोलताना सुशील मोदी म्हणाले की, आज बिहारचे सर्वात मोठे जमीनदार लालू प्रसाद आणि त्यांचे कुटुंब आहे. तेजस्वी यादवने इतक्या कमी वयात एवढी संपत्ती कशी मिळवली? यावर कोणतेही उत्तर न देता जेव्हा ईडी किंवा सीबीआय यांच्याकडून कारवाई करण्यात येते तेव्हा ते इतर मुद्द्यांवर बोलताना दिसून येतात.

तेजस्वी यादव यांच्या पत्नीची प्रकृती बिघडली
ईडीकडून लालू प्रसाद यादव यांच्या मुलींच्या घरी आणि काही जवळच्या नातेवाईकांची ईडीकडून बराच वेळ चौकशी करण्यात आली. याच दरम्यान लालू यादव यांचा मुलगा आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी याद यांनी सीबीआयकडून समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. परंतु, तेजस्वी यादव यांच्या पत्नी या गरोदर असून त्यांना काल (ता. १० मार्च) चक्कर आल्यानंतर दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्यामुळे आज ते सीबीआयसमोर हजर राहू शकत नसल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी तेजस्वी यादव यांनी सीबीआयकडे वेळ मागितली आहे.


हेही वाचा – हसन मुश्रीफांच्या अडचणी संपेना; कागल येथील घरी ईडीचा दुसऱ्यांदा छापा