कर्नल संतोष बाबू यांना अखेरची मानवंदना!

कर्नल संतोष बाबू यांच्यावर सूर्यापेट, तेलंगणा या त्यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Colonel Santosh Babu

भारत-चीन सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत शहीद झालेल्या १६ व्या बिहार रेजिमेंटचे कमांडिंग अधिकारी कर्नल संतोष बाबू यांना आज अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. याआधी त्यांना अखेरची मानवंदना देण्यात आली. त्यांना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमा झाले आहेत. यावेळी लोकांना अश्रू अनावर झाले. त्याचबरोबर चीनविरूद्ध रागही लोकांमध्ये दिसून येत आहे. गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीनचे सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाली. त्यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. यामध्ये बिहार रेजिमेंटचे कमांडिंग अधिकारी कर्नल संतोष बाबू हे देखील शहीद झाले. भारत माता की जय अशा घोषणा देण्यात येत आहेत.

कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. कर्नल संतोष बाबू यांच्यावर सूर्यापेट, तेलंगणा या त्यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कर्नल संतोष बाबू यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, आई आणि वडील असा परिवार आहे. पत्नी आणि मुलं दिल्लीत राहतात. त्यांचे वडील बी उपेंदर हे निवृत्त बँक कर्मचारी आहेत. संतोष बाबू यांची लवकरच हैदराबादमध्ये पोस्टिंग होणार होती. संतोष बाबू २००४ मध्ये सैन्यात भरती झाले आणि त्यांची पहिली पोस्टिंग जम्मू काश्मीरमध्ये झाली. भारत-चीन सीमेवर सुरु असलेल्या तणावाबाबत संतोष बाबू यांचं रविवारी १३ जून रोजी त्यांच्या आईसोबत बोलणं झालं होतं. या हिंसक झटापटीत संतोष बाबू शहीद झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल १६ जूनला दुपारी त्यांच्या कुटुंबीयांना कळवली. कर्नल संतोष बाबू यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.


हेही वाचा – उद्योग जगताला इतिहास बदलण्याची संधी, देशाला आत्मनिर्भर बनवा – पंतप्रधान मोदी