घर देश-विदेश लाल किल्ल्यावर खुर्ची रिकामी ठेवून, व्हिडीओद्वारे खर्गेंचे पंतप्रधान मोदींवर शरसंधान

लाल किल्ल्यावर खुर्ची रिकामी ठेवून, व्हिडीओद्वारे खर्गेंचे पंतप्रधान मोदींवर शरसंधान

Subscribe

नवी दिल्ली : देशाच्या 77व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर 10व्यांदा ध्वजारोहण करून देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी गेल्या नऊ वर्षांच्या काळातील आपल्या सरकारचा लेखाजोखा मांडताना काँग्रेसवर टीका केली. यावेळी विरोधी पक्षांचे नेते आणि खासदार लाल किल्ल्यावर उपस्थित. मात्र, तेथील एक रिकामी खुर्ची सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. ही खुर्ची काँग्रेसच्या एका बड्या नेत्याची होती.

हेही वाचा – पुढील वर्षी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना…, पंतप्रधान मोदी यांना विश्वास

- Advertisement -

पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाच्या वेळी रिकामी असलेली खुर्ची ही राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची होती. पंतप्रधान मोदी यांच्या भाषणास ते अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. मात्र, काँग्रेसने यावर स्पष्टीकरण दिले आहे. प्रकृतीच्या कारणास्तव खर्गे लाल किल्ल्यावरील कार्यक्रमाला गेले नसल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

- Advertisement -

खर्गे यांचा व्हिडीओ जारी
पण त्याचवेळी खर्गे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. लोकशाही आणि संविधान हा आपल्या देशाचा आत्मा आहे. देशाची एकता आणि अखंडता, प्रेम आणि बंधूता, सौहार्द आणि सद्भावनेसाठी लोकशाही आणि संविधानाचे स्वातंत्र्य आम्ही कायम राखू, अशी आम्ही प्रतिज्ञा घेतो, असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी या व्हिडीओत म्हटले आहे. त्यांनी महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद, राजेंद्र प्रसाद, सरोजिनी नायडू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली आहे.

हेही वाचा – राज्यकर्त्यांचा कारभार शुद्ध आहे का? ठाकरे गटाचा मोदी सरकारला थेट सवाल

सर्व पंतप्रधानांचे कौतुक करत भाजपाला टोला
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासह इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव, डॉ. मनमोहन सिंग आणि काँग्रेसच्या इतर पंतप्रधानांच्या योगदानाची माहिती देत काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपासाठी आदर्श असलेले अटलबिहारी वाजपेयी यांचा देखील त्यांनी उल्लेख केला आहे. देशाच्या प्रगतीत प्रत्येक पंतप्रधानाचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. भारताने गेल्या काही वर्षांतच प्रगती केली आहे, असे बिंबविण्याचा प्रयत्न आज काही लोक करत आहेत, अटलबिहारी वाजपेयी तसेच अन्य सर्व पंतप्रधानांनी देशाचा विचार करून विकासासाठी अनेक पावले उचलली, असल्याचे सांगत खर्गे यांनी भाजपाला सुनावले आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, एम्स, इस्रो यांच्या कार्याची जंत्रीच खर्गे यांनी दिली. ते म्हणाले की, नेहरूंनी नव्या स्वतंत्र भारतात कला, संस्कृती आणि साहित्याला प्रोत्साहन दिले. मोदी सरकारने ‘आत्मनिर्भर भारत’च्या धोरणावर भर दिला आहे. या पार्श्वभूमीवर, लाल बहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांच्या धोरणांमुळे भारताला स्वावलंबी होण्यास मदत झाली, असे खर्गे यांनी या व्हिडीओत म्हटले आहे.

भाजपा सरकारवर निशाणा
आज लोकशाही, संविधान आणि स्वायत्त संस्था गंभीर संकटात आहेत, असे आज खेदाने म्हणावे लागत आहे. एखाद्याचा आवाज दडपून टाकण्यासाठी नवनवीन मार्गांचा वापर केला जात आहे. सीबीआय, सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि प्राप्तिकराचे छापे तर पडत आहेतच, पण निवडणूक आयोगालाही कमकुवत बनवले जात आहे, असा आरोप करून खर्गे म्हणाले की, विरोधी खासदारांना गप्प करण्यासाठी त्यांना निलंबित केले जात आहे, माइक बंद केले जात आहेत, भाषणे पटलावरून काढली जात आहेत.

- Advertisment -