लेफ्टनंट जनरल असीम मुनीर हे पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख, कमर जावेद बाजवा यांची जागा घेणार

लेफ्टनंट जनरल सय्यद असीम मुनीर यांची लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती माहिती आणि प्रसारण मंत्री मरियम औरंगजेब यांनी दिली आहे

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये नव्या लष्करप्रमुखाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. जनरल सय्यद असीम मुनीर हे पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख असतील. असीम मुनीर जनरल कमर जावेद बाजवा यांची जागा घेणार आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी असीम मुनीर यांना नवे लष्करप्रमुख बनवत असल्याची घोषणा केली आहे.

पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्री मरियम औरंगजेब यांनी याला दुजोरा दिलाय. पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी लेफ्टनंट जनरल साहिर शमशाद मिर्झा यांची जॉइंट चीफ ऑफ स्टाफ म्हणून आणि लेफ्टनंट जनरल सय्यद असीम मुनीर यांची लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती माहिती आणि प्रसारण मंत्री मरियम औरंगजेब यांनी दिली आहे. मुनीर यांना देशाच्या बलाढ्य लष्कराचे नवे प्रमुख बनवण्यात आले आहे. मुनीर निवृत्त होणाऱ्या जनरल कमर जावेद बाजवा यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत.

संरक्षण मंत्रालयाने नावांची यादी सुपूर्द केली होती
पाकिस्तान सरकारने सांगितले की, बुधवारी लष्करप्रमुखांच्या नियुक्तीसाठी संरक्षण मंत्रालयाकडून नावांचे पॅनेल प्राप्त झालेय. पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “संरक्षण मंत्रालयाकडून जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष आणि लष्करप्रमुखांच्या नावांची यादी प्राप्त झालीय.”

मुनीर हे आयएसआय प्रमुख राहिलेत
असीम मुनीर यांची ऑक्टोबर 2018 मध्ये इंटेलिजन्स चीफ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मुनीर हे जनरल बाजवा यांचे आवडते अधिकारी असल्याचे सांगितले जाते.

असीम मुनीर हे बाजवा यांची जागा घेणार
61 वर्षीय जनरल कमर जावेद बाजवा 29 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या कार्यकाळाला ३ वर्षांची मुदतवाढ देण्यात आली होती. बाजवा यांचा कार्यकाळ जवळपास 6 वर्षांचा होता. आता त्यांच्या जागी असीम मुनीर हे नवे लष्करप्रमुख असणार आहेत.


हेही वाचाः उद्योग-गावं पळवली, सरकार देवधर्म, तंत्र-मंत्र, ज्योतिषीमध्ये अडकले; संजय राऊतांचा घणाघात