लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टरमुळे भारतीय हवाई दलाची वाढली ‘प्रचंड’ ताकद

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सोमवारी स्वदेशी बनावटीचे लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH) दाखल होईल. त्यामुळे हवाई दलाची ताकद आणखी वाढणार आहे. हे बहुउपयोगी हेलिकॉप्टर अनेक क्षेपणास्त्रे डागण्यास आणि इतर शस्त्रे वापरण्यास सक्षम आहे.

हे सार्वजनिक क्षेत्रातील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) एलसीएच विकसित केले आहे. हे प्रामुख्याने उंच भागात तैनात करण्याच्या दृष्टीने हे हेलिकॉप्टर डिझाइन केले असून पहिल्या टप्प्यात 10 हेलिकॉप्टर जोधपूर येथे भारतीय हवाई दलात दाखल करण्यात आले. यादरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर ‘प्रचंड’मधून जोधपूर एअरबेसवर उड्डाण केले.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांच्या उपस्थितीत जोधपूरच्या हवाई दलाच्या स्टेशनवर झालेल्या कार्यक्रमात नौदलाच्या ताफ्यामध्ये एलसीएचचा समावेश करण्यात आला. तसेच याचे ‘प्रचंड’ असे नामकरणही करण्यात आले. राजनाथ सिंह म्हणाले की, ‘एलसीएच शत्रूला चकवा देऊ शकते. तसेच, विविध प्रकारचे दारुगोळा घेऊन घटनास्थळी त्वरित पोहोचू शकते. एलसीएच विविध भूभागांमध्ये आपल्या सशस्त्र दलांच्या गरजा पूर्ण करू शकतील.’ 5.8 टन वजनाच्या आणि दोन इंजिनचे हे हेलिकॉप्टर असून अनेक शस्त्रे वापरण्यासाठी या हेलिकॉप्टरची यापूर्वीच चाचणी घेण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली या वर्षी मार्चमध्ये झालेल्या संरक्षणविषयक मंत्रिमंडळ समितीने (सीसीएस) 3,887 कोटी रुपयांना 15 स्वदेशी बनावटीची एलसीएच खरेदी करण्यास मंजुरी दिली होती. यापैकी 10 हेलिकॉप्टर हवाई दलासाठी आणि पाच लष्करासाठी असतील. अ‍ॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर ‘ध्रुव’सारखेच एलसीएच आहे.

यात अनेक ‘स्टेल्थ’ (रडारच्या टप्प्यात न येणे) वैशिष्ट्ये, आर्मड प्रोटेक्शन सिस्टीम, रात्री हल्ला करण्याची तसेच आपत्कालीन लँडिंगची क्षमता आहे. वजनाने हलके असल्याने ते क्षेपणास्त्रे आणि इतर शस्त्रांसह उंच भागात अतिशय सुलभतेने ऑपरेट होऊ शकते.

या हेलिकॉप्टरमध्ये 45 टक्के स्वदेशी उपकरणे आहेत. नंतरच्या आवृत्तीत त्यात 55 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात येईल. गतिमानता, एक्सेटेंडेड रेंज, उंच भूभाग आणि चोवीस तास तैनात, युद्धकाळात शोध आणि बचावकार्य, शत्रूच्या हवाई संरक्षणावर हल्ला आणि बंडखोरीविरोधी ऑपरेशन आदींसाठी कोणत्याही हवामानात हे हेलिकॉप्टर सक्षम आहे.