Live Update: देशात गेल्या २४ तासात ४१,३२२ नव्या बाधितांची नोंद

live update

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हॅक्सिन दौऱ्यावर असून त्यांनी अहमदाबाद येथील जायडस कॅडिला पार्कला भेट दिली आहे. त्यानंतर आता मोदी हैदराबाद येथील भारत बायोटेक लसीचा आढावा घेण्यासाठी दाखल झाले आहेत.


कोरोनाचा प्रादुर्भाव देशात अद्याप सुरू आहे. गेल्या २४ तासात देशात ४१ हजारांहून अधिकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे देशात आतापर्यंत बाधितांचा आकडा ९३ लाख ५१ हजार ११० इतका झाला आहे. तर गेल्या २४ तासात ४८५ जणांचे प्राण कोरोनामुळे गेला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात ४१ हजार ४५२ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


लॉकडाऊनच्या काळात परळ येथील आपल्या मावशीच्या घरी अडकून पडलेल्या एका १७ वर्षीय तरुणीला एका भीषण प्रकाराला समोरं जावे लागले आहे. या काळात मावशीच्या नवऱ्याने दोन महिने तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी ४० वर्षीय आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, धुळे येथील रहिवाशी असलेली पीडित तरुणी लॉकडाउनच्या काळात मुंबईतील परळ येथील आपल्या मावशीच्या घरी आली होती. याचा गैरफायदा घेत तिच्या मावशीच्या नवऱ्याने अर्थात काकाने तिच्यावर अनेकदा अत्याचार केला.


राष्ट्रवादीचे काँग्रेसचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे कोरोनामुळे निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. त्यांना दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे सांगितले जात असून त्यांच्यावर पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने राष्ट्रवादीवर शोककळा पसरली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शनिवारी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी तयारी सुरू झाल्याचं सांगितलं होतं. पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर चार डिसेंबरला १०० देशांचे राजदूत देखील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन तिथं सुरू असलेल्या कोरोना लसीच्या निर्मितीची प्रक्रिया समजून घेणार आहेत.


पंतप्रधान सकाळी ९.३० वाजता अहमदाबादमध्ये झायडस कॅडिला पार्कमध्ये भेट देतील त्यानंतर ते दुपारी १.३० पर्यंत पंतप्रधान भारत बायोटेक, हैदराबादला भेट देणार आहेत. त्यानंतर ते पुण्यात येतील. पुण्यात Serum Institute ला ते ४.३० वाजता भेट देतील अशी माहिती आहे.


श्रीनगरमधील दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद

जम्मू काश्मीर मधील श्रीनगर येथे २६ नोव्हेंबर रोजी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. या घटनेत जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील यश देशमुख हा जवान शहीद झाला आहे. आज या वीर जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. यश देशमुख गेल्या वर्षी मिल्ट्रीमध्ये भरती झाला होता. गेल्या तीन महिन्यांपासून काश्मीरमध्ये त्याची नेमणूक करण्यात आली होती. शेतकरी कुटुंबातील असलेल्या यशच्या शहीद होण्याने त्याच्या पिंपळगावसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यावर शोककळा पसरली असल्याचं पाहायला मिळत आहे.