घरताज्या घडामोडीLive Update: ‘माझ्या मुलीला कंगनाला सुरक्षा पुरवल्याबद्दल मी अमित शाह यांची ऋणी...

Live Update: ‘माझ्या मुलीला कंगनाला सुरक्षा पुरवल्याबद्दल मी अमित शाह यांची ऋणी आहे’

Subscribe

औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांनी पार केला २६ हजाराचा टप्पा

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ३८७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा २६ हजार ८५२ वर पोहोचला असून आतापर्यंत ७६९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सध्या ५ हजार ६२९ जणांवर उपचार सुरु आहेत. अँटिजेन टेस्ट’द्वारे केलेल्या तपासणीत ‘सिटी एंट्री पॉइंट’वर ६१, ‘मोबाइल स्वॅब कलेक्शन’ पथकास १०७ आणि ग्रामीण भागात ८१ रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. तर दिवसभरात महापालिका हद्दीतील ११९ तर ग्रामीण भागातील १५९ अशा एकूण २७८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यातून २० हजार ४५४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

पुण्यात १,१३,८१२ तर पिंपरी-चिंचवडमधील बाधितांची संख्या ५९ हजार पार

राज्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच राज्यातील महत्वाच्या मुंबई, पुणे, औरंगाबाद शहरामध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. पुण्यात आज दिवसभरात १ हजार ९१६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर पिंपरी-चिंचवडमध्ये १ हजार २९८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १३ हजार ८१२ वर तर पिंपरी-चिंचवडमधील रुग्णसंख्या ५९ हजार ९६६ वर पोहोचली आहे. दोन्ही महापालिकांच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

- Advertisement -

आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना कोरोनाची बाधा

कोरोनाचा फैलाव राज्यात मोठ्या प्रमाणावर होत असून आता आमदार देखील याच्या कचाट्यात सापडू लागले आहेत. उल्हासनगरमधील एका आमदाराला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. उल्हासनगरमधील आमदार डॉ. बालाजी किणीकर हे कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. त्यांना मुंबईमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.


अनलॉकनंतर कचऱ्याचे प्रमाण १२०० मेट्रिक टनने वाढले

मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन नंतर कमी झालेले कचऱ्याचे प्रमाण आता वाढू लागले आहे. कचऱ्याचे प्रमाण वाढून आता ५२०० मेट्रिक टन पर्यंत पोहोचले आहे. लॉकडाऊनच्यानंतर प्रारंभी ४००० मेट्रिक टन एवढा कचरा निर्माण होत होता.


‘माझ्या मुलीला म्हणजेच कंगनाला सुरक्षा पुरवल्याबद्दल मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ऋणी आहे अशी प्रतिक्रिया कंगना रणौतची आई आशा रणौत यांनी दिली आहे. कंगनासोबत जे काही घडलं ते कुणालाही ठाऊक नाही. महाराष्ट्र सरकारने कंगनाला जी वागणूक दिली ती निषेधार्ह आहे. माझ्या मुलीबाबत म्हणजेच कंगनाबाबत जे शब्द महाराष्ट्रात वापरले गेले त्याचा मी निषेध करते’.


देशासह राज्यभरात कोरोनाचा संसर्ग अद्याप सुरू असल्याचेच दिसत आहे. आज राज्यात दिवसभरात २३ हजाराहून अधिक नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ४०० हून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आज १४ हजारहून अधिक रुग्णंना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ७,००,७१५ रुग्ण बरे झाले आहेत. तर अजूनही राज्यात २,६१,४३२ इतके Active रूग्ण असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.


बदल्या सुरूच! राज्यात ५ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या!

एकीकडे कंगना रनौत आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणात राज्य सरकार बॅकफूटवर गेल्याचं चित्र निर्माण झालेलं असतानाच या गोंधळात राज्य सरकारने बदल्यांचं सत्र सुरूच ठेवलं असून राज्यातल्या अजून ७ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये बहुचर्चित अशी तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करून त्या ठिकाणी दुसऱ्या अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारकडून बदल्यांचं राजकारण केलं जात असल्याचे आरोप भाजपचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजप नेत्यांकडून केले जात आहेत. मात्र, त्याला न जुमानता राज्य सरकारने बदल्या करणं सुरूच ठेवलं आहे. काही दिवसांपूर्वीच ‘बदल्या करणं हा राज्य सरकारचा अधिकारच आहे’, अशी ठाम भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील मांडली होती.


अंबड पोलीस स्टेशनच्या लाचखोर पोलीस हवालदाराला अटक

व्यावसायिकाकडून ५ हजार रूपयांची लाच घेणाऱ्या अंबड पोलिस स्टेशनच्या पोलीस हवालदार भास्कर मल्ले याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि.१०) अटक केली.


तर ‘सामना’, संजय राऊतांवरही गुन्हा दाखल करा

अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना यांच्यातला वाद रोज नवनव्या वळणावर जात असल्याचं दिसून येत आहे. कंगनाच्या मुंबईतल्या कार्यालयावर मुंबई महानगर पालिकेने अनधिकृत बांधकामाचं कारण देत तोडकामाची कारवाई केली. मात्र, त्याविरोधात कंगनानं उच्च न्यायालयातून स्थगिती आणली. आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी Kangana Ranaut ची तिच्या मुंबईतल्या घरी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना Ramdas Athavle यांनी शिवसेना आणि मुंबई महानगर पालिकेवर टीका करत ‘सूड भावनेने कंगनावर टीका केली जात आहे. कंगना ड्रग्ज घेत असल्याचं चुकीचं वृत्त सामनानं दिलं. त्यामुळे सामना आणि संजय राऊत यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करायला हवा’, अशी मागणी केली आहे. कंगना रनौतसोबत रामदास आठवलेंनी यावेळी जवळपास तासभर चर्चा केली.


अमेरिकेने सांगितले, एक हजार चिनी विद्यार्थ्यांचा Visa रद्द करण्याचे कारण

अमेरिका आणि चीनमधील वाढत्या तणावाचा परिणाम आता या देशांतील नागरिकांवरही होऊ लागला आहे. राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत अमेरिकेने जूननंतर हजारपेक्षा जास्त चिनी विद्यार्थी नागरिकांचा व्हिसा रद्द केला आहे. अमेरिकेच्या ट्रम्प सरकारचा असा विश्वास आहे की, ज्या चीनी विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे त्यांचा चिनी सैन्याशी संबंध आहे.


नागपूर महापालिका आयुक्तपदावरून तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली होती. २६ ऑगस्ट रोजी या बदलीचे आदेश निघाले होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी ही बदली करण्यात आली होती. मात्र, अवघ्या १५ दिवसांतच अचानक आज मुंढे यांच्या बदलीचा आदेश रद्द करण्यात आल्याने सारेच अवाक् झाले आहेत. पोलीस दलांतील भरत्यांमध्ये झालेल्या गोंधळाप्रमाणेच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधील गोंधळही यामुळे अधोरेखित झाला आहे.


ऑक्सफोर्डच्या लसीचा त्या महिलेवर असा झाला दुष्परिणाम

संपूर्ण जगाला कोरोना विषाणूवरील लसीबाबत उत्सुकता आहे. जगात अजूनही कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असून त्यावरील लस कधी येणार याचीच सगळे वाट पाहत आहेत. अशातच ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने या लसीच्या चाचण्यांवर निर्बंध आणले असून लोकांची निराशा केली आहे. या लसीच्या चाचणीवेळी एका रुग्णावर याचा प्रयोग केला असता त्याचे दुष्परिणाम आढळून आल्याने ही चाचणी थांबवण्यात आली असल्याचे समजते. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि एस्ट्राजेनेका एकत्रितरित्या कोरोना विषाणूवरील लस बनवत आहेत.


मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी दाखल होणार १० METRO ट्रेन्स

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. MMRDAचे आयुक्त आर ए राजीव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई मेट्रोचा दुसरा टप्पा मे २०२१ रोजी सुरू होणार आहे. ११ डिसेंबरला पहिली ट्रेन दाखल होणार असून एप्रिल महिन्यापर्यंत पर्यंत १० मेट्रो ट्रेन दाखल होणार असल्याची माहिती MMRDAच्या आयुक्तांनी गुरूवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.


संभाजी बिडी’ उत्पादक कंपनीचा मोठा निर्णय

गेल्या अनेक दिवसांपासून ‘संभाजी बिडी’ वरून सुरू असलेला वाद आता शमला आहे. छत्रपती संभाजी राजे यांच्या नावावर असणाऱ्या संभाजी बिडीमुळे छत्रपती संभाजी राजे यांचा अवमान होत असल्याची तक्रार गेल्या अनेक वर्षांपासून संभाजी ब्रिगेडकडून केली जात होती. त्यावरून अनेक शिवप्रेमींनी देखील वारंवार नाराजी व्यक्त केली होती. राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील यासंदर्भात आग्रही भूमिका मांडली होती. अखेर त्या प्रकरणाचा आता सोक्षमोक्ष लागलेला असून यासंदर्भात संभाजी बिडीचं उत्पादन करणाऱ्या पुण्याच्या साबळे वाघिरे कंपनीने परिपत्रक काढलं असून लवकरच संभाजी बिडीचं नाव बदलण्याचा निर्णय घेतल्याचं त्यात स्पष्ट करण्यात आलं आहे.


Corona रुग्णांच्या उपचारावर Plasma Therapy प्रभावी नाही – ICMR

कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी अद्याप कोणतेही प्रभावी औषध बाजारात आले नाही, परंतु प्लाझ्मा थेरपी त्याच्या उपचारामध्ये खूप प्रभावी असल्याचे सांगितले जात आहे. दिल्ली सरकारने सर्वप्रथम प्लाझ्मा बँक तयार केली आणि अनेक दावेही केले. नंतर बर्‍याच राज्यांनी ही थेरपी प्रभावी असल्याचे समजून त्या-त्या राज्यात प्लाझ्मा थेरपीची सुरूवात केली.


कंगनाच्या मुंबई ऑफिसवर झालेल्या कारवाईची सुनावणी उच्च न्यायालयाने पुढे ढकलली आहे.


पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने भारतातील मानवी चाचण्या थांबवल्या. याबाबत ट्विटरद्वारे सीरम इन्स्टिट्यूटने माहिती दिली.


लातूर जिल्ह्यातील बोरगाव येथील एका २५ वर्षीय तरुणाने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या २५ वर्षीय तरुणाने नाव किशोर कदम होते आणि तो मराठा आरक्षणाच्या विषयात आलेला अडथळा यामुळे नाराज असल्याचे समोर येत आहे.


मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आले आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.


सर्वोच्च न्यायालयाने कर्जदारांना मोठा दिलासा दिला आहे. २८ सप्टेंबरपर्यंत कर्जवसुली स्थगितीची मुदत वाढवण्यात आली आहे. तसेच न भरलेले हफ्ते तुर्तास थकित कर्ज म्हणून घोषित करू नका, अशी सर्वोच्च न्यायालयाने सूचना दिली आहे.


आजपासून ते १२ तारखेपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण येथील वाशिष्टी नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. १२ ते ४ या वेळेत पूल बंद असणार आहे. हा पूल ब्रिटीशकालीन असून तो जीर्ण झाल्याने याचे स्ट्रक्चर ऑडिट होणार आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आजपासून तीन दिवस १२ ते ४ वेळेत बंद असणार आहे. यामुळे पर्यायी मार्ग म्हणून चिपळूण बायपास फरशी तीठा मार्गाने वाहतूक वळवण्यात येणार आहे.


भारतीय हवाई दलाच्या ‘सारंग एअरोबेटिक टीम’चे प्रात्यक्षिक 

तेजस विमानांची प्रात्यक्षिकं 

राफेलची थरारक प्रात्यक्षिकं


राज्यात मागील २४ तासांत २४४ नवे कोरोनाबाधित पोलीस कर्मचारी आढळले असून ४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा १८ हजार २१६वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत १८४ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून १४ हजार ४५६ बाधित पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ३ हजार ५७६ कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती महाराष्ट्र पोलीस दलाने दिली.


अंबाला एअरबेस येथे राफेल विमानं अधिकृतरित्या भारतीय हवाई दलात सामील होत आहेत. या दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ली कार्यक्रमात सुरू असलेले पारंपारिक ‘सर्व धर्म पूजन’ पाहत आहेत.


आज राफेल लढाऊ विमानांचा भारतीय हवाई दलात अधिकृतरित्या प्रवेश होणार आहे. फ्रान्सहून २९ जुलै रोजी अंबाला एअरबेसवर पोहोचलेले पाच राफेल लढाऊ विमानं अधिकृतरित्या भारतीय वायुसेनाचा भाग घेतली. यासाठी अंबाला एअरबेसवर कार्यक्रम आयोजित केला आहे. यानिमित्ताने भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ली अंबाला एअरबेसवर पोहोचले आहेत. सविस्तर वाचा 


गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. देशात मागील २४ तासांत सर्वाधिक ९५ हजार ७३५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १ हजार १७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ४४ लाख ६५ हजार ८६४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ७५ हजार ६२ रुग्णांचा मृत्यू झाला असून ३४ लाख ७१ हजार ७८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या ९ लाख १९ हजार १८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. सविस्तर वाचा 


९ सप्टेंबरपर्यंत देशात ५ कोटी २९ लाख ३४ हजार ४३३ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी ११ लाख २९ हजार ७५६ नमुन्यांच्या चाचण्या बुधवारी दिवसभरात झाल्या आहे, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.


पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या कारागृहातून आज पहाटे १ वाजण्याच्या सुमारास दोन कैदी फरार झाले आहेत. या कैद्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू होते.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेत आज ६.३० वाजता ‘वर्षा’ बंगलावर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडणार आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर आज पहिली बैठक असणार आहे. बैठकीमध्ये स्थगितीला आव्हान देण्यासंदर्भात आढावा घेण्यात येणार असून पुढील रणनितीवर चर्चा होईल. तसेच या बैठकीला उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, विजय वडेट्टीवार तसेच राज्याचे महाधिवक्ता, राज्य शासनाचे वकील आणि संबंधित अधिकारी उपस्थित राहतील.


जगभरात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगात २ कोटी ८० लाख १९ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी आतापर्यंत ९ लाख ७ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २ कोटी ९५ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात सर्वाधिक कोरोना विषाणूचा कहर अमेरिका, भारत, ब्राझील, रशिया या देशांमध्ये आहेत. सध्या भारत जगातील कोरोनाबाधितांच्या यादीत ब्राझील मागे टाकून दुसऱ्या स्थानावर आहे.


राज्यात १३,९०६ रुग्णांना डिस्चार्ज; ३२५ बाधितांचा मृत्यू

देशासह राज्यभरात कोरोनाचा संसर्ग अद्याप सुरू असल्याचेच दिसत आहे. बुधवारी राज्यात दिवसभरात २३ हजार ८१६ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, ३२५ रुग्णांचा आज मृत्यू झाल्याने राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ९ लाख ६७ हजार ३४९वर पोहोचला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे बुधवारी १३ हजार ९०६ रुग्णंना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ६,८६,४२६ रुग्ण बरे झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -