मुंबई : महाराष्ट्रात लोकसभेच्या 42पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. देशातल्या लोकशाहीचे हे दशावतार आहेत. निवडणूक आयोग, संसद, न्यायालये, ईव्हीएम असे सगळे काही एक-दोन व्यक्तींच्याच मुठीत असल्यावर ही मंडळी महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागाच काय, 148 जागा आणि देशात 700 जागा सहज जिंकू शकतात, अशी बोचरी टीका ठाकरे गटाने केली आहे.
हेही वाचा – Thackeray group : ‘ही’ गॅरंटी मोदी-शहांच्या राजकारणाने दिली आहे, ठाकरे गटाचे शरसंधान
शरद पवार यांनी प्रचंड मेहनतीने उभा केलेला राष्ट्रवादी पक्ष निवडणूक आयोगाने त्यांच्याच पक्षातील फुटीर आयतोबा अजित पवार यांच्या हवाली केला याचे आश्चर्य किंवा खंत वाटण्याचे कारण नाही. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबाबत भारताचा निवडणूक आयोग सत्यास धरून प्रामाणिक निर्णय घेईल, याची शक्यताच नव्हती. कारण निवडणूक आयोग हा ‘भारता’चा राहिलेला नसून तो मोदी-शहा यांचा झाला आहे. अशा संविधानिक संस्थांच्या गळ्यात हुकूमशहांचे पट्टे बांधले असतील तर त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा कशी करणार? अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखातून केली आहे.
‘‘आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत,’’ असा अतिविनम्र आविर्भाव अजित पवार यांनी आणला. हे ढोंग आहे. मोदी-शहांची गॅरंटी हेच या घडामोडींचे सूत्र आहे, असे या अग्रलेखात म्हटले आहे.
हेही वाचा – Danve about CM : वंदे भारत, राम मंदिर या गोष्टी…, अंबादास दानवेंनी मुख्यमंत्री शिंदेंना सुनावले
श्रीमान मोदी हे संसदेत आणि बाहेर तर्कहीन भाषणे करतात आणि त्यांचे अंधभक्त टाळ्या वाजवतात. या टाळकुट्यांमुळेच देशात कधी मोगलांचे तर कधी ब्रिटिशांचे राज्य आले होते, पण त्याही काळात छत्रपती शिवराय, संभाजी महाराज, भगतसिंग, राजगुरू, सावरकर निर्माण झालेच होते आणि देशावर अन्याय करणाऱ्यांचे धिंडवडे निघाले होते. राष्ट्रवाद हा भाजपाचा अजेंडा नसून फक्त निवडणूक आणि सत्ता हाच त्यांचा आत्मा बनला आहे, असे सांगून ठाकरे गटाने म्हटले आहे की, देशभरात ते 400 पार करणार आहेत. यावर राष्ट्रीय जनता दलाच्या मनोज झा यांनी उत्तर दिले आहे, ‘‘तुम्ही नेमका आकडा सांगताय याचा अर्थ त्या पद्धतीने ‘ईव्हीएम’ सेट झाल्या आहेत.’’
तथापि, अनेक घाव झेलून शिवसेना उभी आहे. उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यांनी झंझावात निर्माण केला आहे. शरद पवारही अनेक वादळे आणि संकटे झेलून उभेच आहेत. निवडणूक आयोग महाराष्ट्राचा हा उत्साह कसा संपवणार? मोदी-शहांची अप्रामाणिक गॅरंटी आणि निवडणूक आयोगाची घटनाबाह्य झुंडशाही यांचा पराभव महाराष्ट्राची जनता केल्याशिवाय राहणार नाही, असेही ठाकरे गटाने म्हटले आहे.
हेही वाचा – Coastal Road : निवडणुका पक्षांना मजेशीर गोष्टी करायला लावतात, आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा