मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. देशात सर्वाधिक जागा असणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पार्टीची युती निश्चित झाली आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या विविध तर्कवितर्कांना त्यामुळे छेद मिळाला आहे. ‘शेवट गोड त्याचे सारेच गोड! युती होईल आणि वाद नाही. लवकरच सर्व गोष्टी स्पष्ट होतील,’ असे समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी बुधवारी सांगितले. फसलेली चर्चा पुन्हा रुळावर आणण्यामागे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा असल्याचे सांगितले जाते.
हेही वाचा – Politics : जागांच्या फॉर्म्युल्यावर शिंदेंचा खासदार आक्रमक; म्हणतो, आम्ही भाजपच्या दावणीला…
लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या वर्षी स्थापन झालेल्या इंडिया या विरोधकांच्या आघाडीत समाजवादी पार्टी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचा समावेश आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर एकमत होत नव्हते. काँग्रेसला आधी 11 जागा देण्याची तयारी समाजवादी पार्टीने दर्शविली होती, पण काँग्रेसने त्यास नकार दिला. यानंतर ओढाताण केल्यानंतर अखेर काँग्रेस 17 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात येते. वाराणसीची जागाही काँग्रेसला दिली जाणार आहे. यावर समाजवादी पार्टीने आपला उमेदवार जाहीर केला होता, मात्र आता ही उमेदवारी मागे घेण्यात येणार आहे, असे सांगितले जाते.
#WATCH | Lucknow, UP: On seat sharing with Congress, Samajwadi Party leader Ravidas Mehrotra says “…SP and Congress will contest LS elections together. This will strengthen the INDIA alliance and INDIA will form its govt in 2024…We have tried to stop the scattering of non-BJP… pic.twitter.com/BvZ66bBBb0
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) February 21, 2024
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी मंगळवारी समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि त्यानंतर बिनसलेली चर्चा पुन्हा सुरू झाली. समाजवादी पार्टीने काल, मंगळवारी तिसरी यादीही जाहीर केली होती, पण तरीही वाराणसीची जागा काँग्रेसला देण्यात येणार आहे.
हेही वाचा – Maharashtra Politics : भाजपा नेते आशिष देशमुखांचा विरोधी पक्षनेत्यांबाबत मोठा दावा, म्हणाले…
उत्तर प्रदेशातील अमेठी, रायबरेली, वाराणसी, महाराजगंज, देवरिया, बांसगाव, सीतापूर, अमरोहा, बुलंदशहर, गाझियाबाद, कानपूर, झाशी, बाराबंकी, फतेहपूर सिक्री, शाहजहांपूर, मथुरा आदी जागांवर काँग्रेस निवडणूक लढवू शकते. काँग्रेस आणि समाजवादी पार्टी युतीची घोषणा करण्यासाठी बुधवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेचेही आयोजन करण्यात आले आहे. याआधी काँग्रेसने मुरादाबादची जागा मागितली होती, मात्र आता पक्षाने ती सोडून सीतापूर, श्रावस्ती आणि वाराणसीची मागणी केली आहे. त्यापैकी सीतापूर आणि वाराणसीचा फैसला झाला आहे, तर श्रावस्ती जागेवर चर्चा सुरू आहे.
उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पार्टीची युती पहिल्यांदाच झालेली नाही. 2017च्या विधानसभा निवडणुकीतही दोन्ही पक्षांनी युती करून निवडणूक लढवली होती. त्यावेळी अखिलेश यादव आणि राहुल गांधींना ‘यूपीची मुले’ म्हणून मैदानात उतरवले होते. मात्र, दोन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवूनही फारसे यश मिळू शकले नाही आणि भाजपाला मोठा विजय मिळाला. त्यानंतर योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री करण्यात आले.
हेही वाचा – Politics : युगेंद्र असो वा जोगेंद्र, निवडणुकीपूर्वी महाभूकंप होईल; मिटकरींचा दावा