घरलोकसभा २०१९खडाजंगीचंद्रपुरात दुहेरी लढत भाजपसाठी डोकेदुखी

चंद्रपुरात दुहेरी लढत भाजपसाठी डोकेदुखी

Subscribe

१९५२ पासून १९९९ पर्यंत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे कायम वर्चस्व होते. त्यानंतर मात्र २००४, २००९ आणि २०१४ या सलग तीन लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला. मात्र प्रत्येक वेळी वामन चटप यांनी निवडणूक लढवून इथे तिरंगी लढत केली, त्यातून काँग्रेसच्या मतांची विभागणी होत गेली आणि भाजपचे हंसराज अहिर निवडून येत गेले. यावेळी मात्र प्रथम इथे भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच दुहेरी लढत होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात यंदा मतविभागणी होण्याची शक्यता कमी आहे. ज्यामुळे भाजपचे अहिर यांची खरी कसोटी लागणार आहे.

स्वातंत्र्यकाळापासून ते अगदी ९०च्या दशकापर्यंत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व राहिले. त्यानंतर या ठिकाणी काँग्रेसला प्रतिस्पर्धी म्हणून भाजप समोर आला. हंसराज अहिर यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळवून दिला आणि तो २००४ पासून भाजपकडे सुरक्षित ठेवला. यामागे प्रत्येक निवडणुकीत मतविभागणी कारणीभूत होती. २००९मध्ये स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने वामनराव चटप उभे होते, त्यांनी दीड लाखांहून अधिक मते घेतली होती. त्यामुळे काँग्रेसचे नरेश पुगलिया यांचा पराभव झाला आणि भाजपचे हंसराज अहिर निवडून आले होते. २०१४ मध्येही पुन्हा वामनराव चटप ‘आप’मधून उभे राहिले, तेव्हाही त्यांनी २ लाख मते घेतली होती. त्यामुळे काँग्रेसचे संजय देवतळे यांना पराभव सहन करावा लागला आणि भाजपचे पुन्हा हंसराज अहिर निवडून आले.

- Advertisement -

अशा प्रकारे वामनराव चटप यांच्यामुळे या ठिकाणी मतविभाजन होऊन त्याचा फायदा हंसराज अहिर यांना होत गेला. मात्र यंदा २०१९मध्ये चित्र वेगळे आहे. यंदा वामनराव चटप यांनी निवडणूक न लढवता काँग्रेसचे उमेदवार सुरेश धानोरकर यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात दुहेरी लढत होणार आहे. परिणाम हंसराज अहिर यांची आता खरी कसोटी लागणार आहे. तसेच यामुळे या ठिकाणची लढतही अधिक चुरशीची होणार आहे. सध्या या भागात हंसराज अहिर आणि सुधीर मुनगंटीवार हे दोन भाजपचे खंदे नेतृत्त्व आहे. कोणत्याही निवडणुकीत हे दोन नेतृत्त्व एकत्र येते आणि भाजपला विजय मिळवून देते. यंदाही चंद्रपूरमध्ये भाजपची हीच एकीची ताकद अहिर यांच्या पाठिशी असणार आहे. मुनगंटीवार यांनीही विकासकामे करून या जिल्ह्यात भाजप बराच सक्षम बनवला आहे.

काँग्रेसने मात्र यावेळी नवीन प्रयोग केला आहे. शिवसेनेमधून काँग्रेसमध्ये आलेले सुरेश धानोरकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे वामनराव चटप यांनीही धानोरकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच काँग्रेसमधील सर्व गटतट एकत्र येऊन धानोरकर यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत. त्यामुळे या ठिकाणी आता काँग्रेसची ताकद वाढलेली आहे. म्हणूच आतापर्यंत बहुरंगी लढतीत होणारी मतविभागणी हंसराज अहिर यांच्या पथ्यावर पडत होती. यावेळी दुहेरी लढतीचे आव्हान अहिर कसे पेलणार याकडे लक्ष लागले आहे. गेल्या 20 वर्षांपासून काँग्रेसच्या पदरी यश मिळत नव्हते. काँग्रेसचे हे नैराश्य दूर करण्यात तरुण आणि तडफदार धानोरकर यशस्वी ठरू शकतील.

- Advertisement -

धानोरकर हे भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. गेल्या चार वर्षांत त्यांनी शिवसेनेपलीकडे जाऊन स्वतःची ताकद निर्माण केली आहे. त्यामुळे ते भाजपसाठी प्रबळ उमेदवार ठरू शकणार आहेत. चंद्रपूरमध्ये कुणबी समाजाची मते सर्वाधिक आहेत आणि धानोरकर हे कुणबी समाजाचे आहेत. जिल्ह्यात आजवर कुणबी समाजाकडे नेतृत्त्व आले नाही ही खंत या समाजाची होती, ती धानोरकर यांच्या माध्यमातून कुणबी समाज दूर करू शकतो, तसेच दलित आणि मुस्लिम मतेही धानोरकर यांना मिळाली, तर मात्र हंसराज अहिर यांना ही निवडणूक कठीण जाईल.

यंदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राजेंद्र महाडोळे यांना उमेदवारी मिळाली आहे. महाडोळे या निवडणुकीत वामनराव चटप यांच्या इतकी तरी मतविभागणी करणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीमुळे चंद्रपूर लोकसभेची निवडणूक तिरंगी लढतीत होईल, असे म्हणता येणार नाही. म्हणूनच या ठिकाणी सरळसरळ दुहेरी लढत होणार आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात राजूर, चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, वाणी आणि अर्णी असे सहा विधानसभा क्षेत्रे येतात. यातील वरोरा विधानसभा शिवसेनेने जिंकली असून उर्वरित पाच विधानसभा क्षेत्रात भाजपचा आमदार निवडून आला आहे. सध्या या ठिकाणी क्षेत्रीय राजकारणात जरी भाजप वरचढ दिसत असली, तरी काँग्रेसने उमेदवाराबाबत बदललेली भूमिका भाजपसाठी डोकेदुखी बनली आहे.

१९५२ पासून १९९९ पर्यंत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून सलग काँग्र्रेस विजयी होत आली आहे. केवळ १९९६ मध्ये या मतदारसंघातून भाजपचे हंसराज अहिर हे विजयी झाले होते. २००४ पासून मात्र २०१४ दरम्यान तीन वेळा पुन्हा हंसराज अहिर या ठिकाणाहून निवडून आले. अशा प्रकारे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ आता भाजपचा बालेकिल्ला बनला आहे. २०१९मध्येही भाजपने हंसराज अहिर यांनाच उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने सुरेश धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे, तर वंचित बहुजन आघाडीने राजेंद्र महाडोळे यांना उमेदवारी दिली आहे.

Nityanand Bhise
Nityanand Bhisehttps://www.mymahanagar.com/author/bnityanand/
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -