लोकसभा निवडणूक सात टप्प्यात

23 मे रोजी मतमोजणी आणि निकाल, नाशिकमध्ये 29 एप्रिलला मतदान

Lok Sabha elections

अखेर रविवारी लोकसभा निवडणुकीची नौबत झडली. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी लोकसभा निवडणूक-२०१९ ची घोषणा येथील पत्रकार परिषदेत केली. या निवडणुका देशभरातील ५४३ मतदार संघासाठी सात टप्प्यात होणार आहेत. त्यातील पहिला टप्पा ११ एप्रिल रोजी सुरू होणार असून १९ मेला अंतिम म्हणजे सातव्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. २३ मे रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होतील, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले. महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक चार टप्प्यात होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या घोषणेबरोबरच देशभरात आचार संहिता लागू झाली आहे.

विद्यमान लोकसभेची मुदत येत्या ३ जून रोजी संपणार आहे. त्यापूर्वी नवीन लोकसभा स्थापन होण्याच्या उद्देशाने निवडणुक आयोगाने रविवारी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील निवडणुकांसाठी निवडणूक निरिक्षकांची बैठक पुढील आठवड्यात होणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना निवडणूक आयुक्त म्हणाले की, व्हीव्हीपॅट हे सर्व मतदान केंद्रावर बसवण्यात येणार आहेत.

पहिल्या टप्प्यासाठी मतदान ११ एप्रिल, दुसर्‍या टप्प्यासाठी १८ एप्रिल, तिसर्‍या टप्प्यासाठी २३ एप्रिल, चौथ्या टप्प्यासाठी २९ एप्रिल, पाचव्या टप्प्यासाठी ६ मे, सहाव्या टप्प्यासाठी १२ मे आणि सातव्या टप्प्यासाठी १९ मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाची तारिख निश्चित करताना शालेय, महाविद्यालयीन परिक्षा, सण, उत्सव यांचा विचार करण्यात आला. तसेच विविध राजकीय पक्षांशी चर्चाही करण्यात आली. मतदान पॅनलने मागील काही आठवड्यांमध्ये देशभरात अनेक मिटिंग घेतल्या, अशी माहिती सुनील अरोरा यांनी दिली.

देशभरात ५४३ लोकसभा मतदार संघातील १० लाख मतदार केंद्रावर ईव्हीएम मशिन बसवण्यात येणार आहेत. यावेळी देशभरातून ९० लाख मतदार मतदान करणार आहेत. त्यापैकी १८-१९ वयोगटातील १.५९ कोटी मतदार आहेत. उमेदवारांना उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत मतदान नोंदणी सुरू रहाणार आहे.

राज्यात चोख सुरक्षा व्यवस्थेत होणार मतदान

महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात एकूण ४ टप्प्यात निवडणूक घेण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला. महाराष्ट्रात ११ एप्रिल ते २९ एप्रिल दरम्यान चार टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले. संपुर्ण चार टप्प्यांमध्ये मतदान झाल्यानंतर देशात एकाचवेळी २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्मचारी तसेच सुरक्षा व्यवस्था पुरेशा प्रमाणात असल्याने लोकसभा २०१९ च्या निवडणुकीचे चार टप्पे असणार आहेत अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्विन कुमार यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

निवडणूक आयोगाने राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. याआधी २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकुण ५०.६७ टक्के मतदान झाले होते,

तर २०१४ लोकसभा निवडणुकीत ६०.३२ टक्के इतके मतदान झाले होते. लोकसभा निवडणुकी २०१९ साठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. २३ मे रोजीच्या मतमोजणीनंतरही आचारसंहिता २७ मे पर्यंत कायम राहील. सगळ्याच राजकीय पक्षांसमोर निवडणूक प्रचारासाठी आता एक महिन्याहून कमी कालावधी उरला आहे.

महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे टप्पे

पहिला टप्पा – ११ एप्रिल ७ जागा
दुसरा टप्पा – १८ एप्रिल १० जागा
तिसरा टप्पा – २३ एप्रिल १४ जागा
चौथा टप्पा – २९ एप्रिल १७ जागा

निवडणुक खर्च, पेड न्यूजवर नियंत्रण

निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अनुदानाचे वाटप, मंत्र्यांचे दौरे, शासकीय वाहनांचा वापर, शासकीय निधीतून जाहिरात प्रसिद्ध करणे, नवीन कामांची आणि योजनांची घोषणा करणे यासाठी निर्बंध लागू झाले आहेत. निवडणूक खर्चावर देखरेख आणि नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यस्तरावर तसेच जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. राजकीय पक्षांच्या आणि उमेदवारांच्या जाहिराती प्रमाणिकरण करण्यासाठी राज्य तसेच जिल्हा स्तरावर माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे.

महिला मतदार वाढले

लोकसभा २०१४ निवडणूकीसाठी ८ कोटी ७ लाख ९८ हजार ८२३ मतदार होते. २०१९ मध्ये यामध्ये वाढ होताना ही मतदारांची संख्या ८ कोटी ७३ लाख ३० हजार ४८४ इतकी पोहचली आहे. यंदा ६५ लाख ३१ हजार ६६१ नवीन मतदारांची भर पडली आहे. महिला मतदारांचा आकडा जो २०१४ मध्ये प्रत्येक १००० पुरूषांमागे ८८९ होता त्यामध्ये वाढ होत ९११ वर पोहचला आहे. तर तृतीयपंथी मतदारांची संख्या २०१४ मध्ये जिथे ९१८ होती, ती २०१९ मध्ये २०८६ झाली आहे. पहिल्यांदाच मतदान करणारे नवमतदार जे १८ ते २२ वयोगटातील आहेत, अशा मतदारांमध्ये १ लाख ४ हजार ४३५ पुरूष मतदार तर, १७ लाख ३२ हजार १४६ महिला नवमतदार आहेत. तर तृतीयपंथी मतदार हे अवघे १४२ इतकेच वाढले आहेत.

दिव्यांग मतदारांना सुलभ निवडुका

दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा या हेतूने सुलभ निवडणुका हे घोषवाक्य भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तालय तसेच अशासकीय संस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांची नोंदणी करून घेण्यात येत आहे. यावर्षी मतदार यादीत २ लाख २४ हजार १६२ अपंग मतदार समाविष्ट आहेत. दिव्यांगांंना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हील चेअरची मागणी नोंदवणे आदी सोयी उपलब्ध करून घेण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने PwD हे मोबाईल एप्लिकेशन उपलब्ध करून दिले आहे.

Lok Sabha elections

निवडणुकांसाठी यंत्रणा सज्ज

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी सुमारे ६ लाख इतक्या मोठ्या प्रमाणावर कर्मचार्‍यांची नेमणुक करण्यात येणार आहे. त्यासोबतच पुरेसे पोलिस कर्मचारीही नेमण्यात आले आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघात ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात २ लाख १५ हजार बॅलेट युनिट, १ लाख २४ हजार कंट्रोल युनिट आणि १ लाख ३५ हजार व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार आहे. या मशीनचा वापर पहिल्यांदाच महाराष्ट्रात होणार असल्याने मतदारांमध्ये जागृती आणि विश्वासाहर्ता निर्माण करण्यासाठी सर्व मतदान केंद्रावर मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून प्रत्यक्ष मशीनवर जनतेला माहिती देण्यात येत आहे. आतापर्यंत ५४ लाख ३० हजार जनतेने या उपक्रमात भाग घेतला आहे. तर ३८ लाख ७० हजार जनतेने प्रत्यक्ष या मशीनचा डेमो वापरला आहे. २०१४ च्या तुलनेत यंदा मतदान केंद्रांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. ही वाढ शहरी भागात झाली आहे, तर ग्रामीण भागात मात्र मतदान केंद्रांच्या संख्येत घट झाली आहे.

ग्रामीण भागात यंदा ५५ हजार ८१४ मतदान केंद्रे आहेत. तर शहरी भागात ३९ लाख ६५९ मतदान केंद्रे असणार आहेत. शहरी मतदान केंद्रांच्या संख्येत ११ हजार ९९६ इतकी वाढ झाली आहे. याआधी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी २७ हजार ६६३ मतदार केंद्रे उपलब्ध होती.

आचारसंहितेवर नियंत्रणासाठी एप

आदर्श आचारसंहितेवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने cVigil हे मोबाईल एप्लिकेशन विकसित केले आहे. एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होताना दिसल्यास त्या प्रसंगाचे छायाचित्र किंवा व्हिडिओ काढून दक्ष मतदाराला तक्रार नोंदवता येणार आहे. राज्य स्तरावर स्टेट कॉन्टॅक्ट सेंटर तसेच जिल्हा स्तरावर डिस्ट्रिक्ट कॉन्टॅक्ट सेंटर स्थापन करण्यात आले आहे. मतदारांना सर्व प्रकारची माहिती मिळावी तसेच तक्रार निवारणासाठी १९५० या टोल फ्री क्रमांकाची सुविधा सर्व जिल्ह्यांमध्ये करून देण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदींनी मागितले जनतेचे आशीर्वाद

निवडणूक आयोगाकडून निवडणुकांची घोषणा होताच, पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा जनतेचे आशीर्वाद मागितले. भाजप सरकारने आपल्या 5 वर्षांच्या कार्यकाळात मुलभूत गरजांना प्राधान्य देत विकासकामे केली आहेत. सबका साथ, सबका विकास या संकल्पनेतून भाजपाने विकासाच्या माध्यमातून देशाला उभारण्याचे काम केले आहे. गेल्या 70 वर्षांपासून रखडलेल्या कामांना या 5 वर्षात गती देण्याच काम आम्ही केले. त्यामुळे आता, सशक्त आणि सुरक्षित भारत बनवूया, फिर एक बार मोदी सरकार अशी घोषणा देत पुन्हा एकदा भाजपप्रणित आघाडीला निवडूण देण्याचे आवाहन केले आहे.

ठळक मुद्दे
*२०१९ लोकसभेला ९० कोटी मतदार
*१८ ते १९ वयोगटातील दीड कोटी मतदार
*देशभरात १० लाख मतदार केंद्र
*ईव्हीएमवर उमेदवाराचा फोटो
*मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅटची सुविधा
*१७.४ लाख व्हीव्हीपॅटचा वापर
*आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई
*तक्रारीसाठी अ‍ॅपची सुविधा
*ईव्हीएमच्या प्रवासावर जीपीएसची नजर
*रात्री १० ते सकाळी ६ लाऊडस्पीकर बंद
*नाव तपासणी आणि निवडणूकसंबंधी माहितीसाठी
*१९५० या क्रमांकाची हेल्पलाईन
*सर्व कार्यक्रमांची व्हिडिओ काढणार
*उमेदवारांना त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटचे डिटेल द्यावे लागणार

महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान

पहिला टप्पा, 11 एप्रिल रोजी 7 जागांसाठी मतदान
वर्धा, रामटेक, नागपूर, भंडार – गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ- वाशिम

दुसरा टप्पा, 18 एप्रिल रोजी 10 जागांसाठी मतदान
बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर

तिसरा टप्पा, 23 एप्रिल रोजी 14 जागांसाठी मतदान
जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

चौथा टप्पा, 29 एप्रिल रोजी 17 जागांसाठी मतदान
नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, उत्तर पूर्व, उत्तर मध्य, दक्षिण मध्य आणि दक्षिण मुंबई.

हे आहेत सात टप्पे

*पहिल्या टप्प्यात – ११ एप्रिलला मतदान
*दुसर्‍या टप्प्यात – १८ एप्रिलला मतदान
*तिसर्‍या टप्प्यात – २३ एप्रिलला मतदान
*चौथ्या टप्प्यात – २९ एप्रिलला मतदान
*पाचव्या टप्प्यात – ६ मेला मतदान
*सहाव्या टप्प्यात – १२ मेला मतदान
*सातव्या टप्प्यात – १९ मेला मतदान २३ मेला मतमोजणी