स्वत:चा ट्रॅक रेकॉर्ड पाहा, संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताने पाकिस्तानला सुनावले

न्यूयॉर्क : भारताने गुरुवारी संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA) पाकिस्तानविरुद्ध आपला ‘उत्तराचा अधिकार’ (Right of Reply) वापरला आणि दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रय देणारा देश म्हणून पाकिस्तानचा ट्रॅक रेकॉर्ड पाहण्याचा सल्ला दिला. पाकिस्तानला (Pakistan) स्वत:कडे आणि आपल्या मागील रेकॉर्ड तपासून बघण्याची गरज आहे. कसलीही तमा न बाळगता, दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रय देणारा देश त्याला पाहावे लागेल आणि यासाठी त्याला शिक्षाही दिली जात नाही, असे भारताच्या स्थायी मिशनचे महावाणिज्यदूत प्रतीक माथूर यांनी पाकिस्तानला सुनावले.

संयुक्त राष्ट्र महासभेच्या 11व्या तातडीच्या विशेष सत्रात प्रतीक माथुर बोलत होते. भारताने पाकिस्तानच्या चिथावणीला प्रत्युत्तर न देण्याचा निर्णय घेतला आहे, हे सांगण्यासाठी मी या व्यासपीठाचा वापर करत असल्याचे सांगत माथूर यांनी, भारताने यापूर्वी वापरलेल्या उत्तराच्या अधिकाराचा संदर्भ तपासून घेण्याचा सल्लाही पाकिस्तानी शिष्टमंडळाला दिला.

पाकिस्तानची अनावश्यक चिथावणी ‘खेदजनक’ असल्याचे सांगत माथूर म्हणाले की, दोन दिवसांच्या सखोल चर्चेनंतर, संघर्ष आणि मतभेद सोडवण्यासाठी शांततेचा मार्ग हा एकमेव मार्ग असू शकतो, याबाबत संयुक्त राष्ट्रांमध्ये उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांनी सहमती दर्शवली आहे.

पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाचा (LeT) उपप्रमुख अब्दुल रहमान मक्की या भारताच्या मोस्ट वाँटेड अतिरेक्याला जानेवारीमध्ये जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले होते. भारताने 2021-22 या कालावधीत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या कार्यकाळात पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या यादीला सर्वोच्च प्राथमिकता दिली होती. या यादीत अब्दुल रहमान मक्की (LeT), अब्दुल रौफ असगर (JM), साजिद मीर (LeT), शाहिद महमूद (LeT) आणि तल्हा सईद (LeT) या पाच जणांचा समावेश आहे. यूएनचा स्थायी सदस्य असलेल्या चीनने तांत्रिकतेच्या आधारावर या यादीत पाच जणांच्या नावांचा समावेश करण्यास नकार दिला होता. विशेष म्हणजे, परिषदेच्या इतर सर्व 14 सदस्यांनी त्यांना यादीत समाविष्ट करण्यास सहमती दर्शविली होती.