घरदेश-विदेशराज्यसभेत चार राज्यांच्या 'या' 4 जागांवर नजरा; क्रॉस व्होटिंग-हॉर्स ट्रेडिंगच्या धोक्यापायी आमदारांचा...

राज्यसभेत चार राज्यांच्या ‘या’ 4 जागांवर नजरा; क्रॉस व्होटिंग-हॉर्स ट्रेडिंगच्या धोक्यापायी आमदारांचा भाव वधारला

Subscribe

केंद्रीय निवडणूक आयोगाने 15 राज्यांतील 57 जागांसाठी निवडणुका जाहीर केल्या होत्या, मात्र यूपी-बिहारसह 11 राज्यांतील 41 जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आलेत.

नवी दिल्ली: राज्यसभेसाठी आता हरियाणा-राजस्थानसह चार राज्यांतील चार जागांसाठी स्पर्धा तीव्र झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने 15 राज्यांतील 57 जागांसाठी निवडणुका जाहीर केल्या होत्या, मात्र यूपी-बिहारसह 11 राज्यांतील 41 जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान आणि हरियाणामध्ये आता 10 जून रोजी मतदान होणार आहे, कारण या राज्यांमध्ये संख्येपेक्षा जास्त उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे राजकीय पक्ष आमदारांना आता रिसॉर्ट-हॉटेलमध्ये मुक्काम करण्यासाठी कसरत करत असल्याचं पाहायला मिळत आहे, जेणेकरून क्रॉस व्होटिंग आणि हॉर्स ट्रेडिंगसारखे धोके टाळता येतील. अपक्ष आणि लहान पक्षांना आपल्या गोटात आणण्यासाठी भाजप-काँग्रेस आणि इतर पक्षांनी पूर्ण ताकद झोकून दिली आहे. (Rajya Sabha Election 2022)

राजस्थान : सुभाष चंद्रा यांच्या दावेदारीची स्पर्धा रंजक

राजस्थानमध्ये चौथ्या जागेसाठी सत्ताधारी काँग्रेसचे प्रमोद तिवारी आणि भाजप समर्थित अपक्ष सुभाष चंद्रा यांच्यात लढत आहे. सुभाष चंद्रा यांनी यापूर्वीच राज्यसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. जागा जिंकण्यासाठी 42 मतांची आवश्यकता आहे. प्रमोद तिवारी यांना 15 मतांची गरज आहे, तर चंद्रा यांना 11 अतिरिक्त मतांची गरज आहे. दोन्ही पक्षांच्या नजरा छोटे पक्ष आणि अपक्षांवर आहेत. घोडेबाजाराच्या भीतीने आमदारांची अडवणूक केली जात आहे. सुभाष चंद्रा यांनी 8 आमदारांची मतं मिळवल्याचा दावा केला आहे. चंद्रा म्हणतात की, काँग्रेसचे चार आमदारही त्यांच्या बाजूने मतदान करणार आहेत.

- Advertisement -

हरियाणा: काँग्रेससाठी मोठं आव्हान

हरियाणात भाजपला एका जागेवर विजय मिळण्याची खात्री आहे. दुसऱ्या जागेसाठी काँग्रेसचे अजय माकन आणि भाजप समर्थित अपक्ष कार्तिकेय शर्मा यांच्यात लढत आहे. विजयासाठी 31 मतांची आवश्यकता आहे. कार्तिकेय यांना भाजपच्या 10 अतिरिक्त आमदारांचा आणि जेजेपीच्या 10 आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. दोघांची नजर सात अपक्ष आमदारांवर आहे. काँग्रेसच्या सर्व आमदारांची मते मिळाल्यास माकन यांचा विजय निश्चित आहे.

महाराष्ट्रात सहावी जागा कोण जिंकणार?

राज्यातील सहाव्या जागेसाठी भाजपचे धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार यांच्यात लढत आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारची विश्वासार्हता पणाला लागली आहे. राज्यातील आमदारांच्या संख्येनुसार प्रत्येक जागा जिंकण्यासाठी 42 मतांची गरज आहे. भाजपला 22 अतिरिक्त आणि 7 जणांचा पाठिंबा आहे. म्हणजेच त्यांची 29 मते निश्चित असली तरी आणखी 13 मते आवश्यक आहेत. आघाडीकडे 26 अतिरिक्त मते असून, त्यांना 16 अतिरिक्त मतांची आवश्यकता आहे. लहान पक्ष आणि अपक्षांची संख्या 29 असून, याकडे दोन्ही भाजप आणि महाविकास आघाडीचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

कर्नाटक : चौथ्या जागेवर त्रिकोणी लढत

कर्नाटकात चौथ्या जागेसाठी भाजपचे लहर सिंग सिरोया, काँग्रेसचे मन्सूर अली खान आणि जेडीएसचे डी कुपेंद्र रेड्डी यांच्यात लढत आहे. ही जागा जिंकण्यासाठी 45 मतांची गरज आहे. भाजपकडे 32, काँग्रेसकडे 25 आणि जेडीएसकडे 32 मते आहेत. अशा स्थितीत फासे कोणत्याही दिशेने वळू शकतात. भाजप विजयासाठी दुसऱ्या पसंतीची मते आणि अपक्षांच्या पाठिंब्यावर अवलंबून असल्याचे दिसत आहे.


हेही वाचाः “एमआयएम आणि समाजवादीच्या दाढ्या कुरवळणारे…”; मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -