लखनऊ : देशात एकीकडे नववर्षाचे जल्लोषात स्वागत सुरू असताना दुसरीकडे मात्र उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊमधील एका हॉटेलात मोठे हत्याकांड घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हत्याकांडामुळे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी लखनऊ हादरले आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली असून लखनऊमधील हॉटेल शरणजीतमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी ज्या पाच जणांची हत्या करण्यात आली आहे, त्याच कुटुंबातील एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. (Lucknow Crime On the first day of new year brutal murder of five members of same family in hotel)
मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा येथे वास्तव्यास असलेले एक कुटुंब लखनऊमधील शरणजीत हॉटेलमध्ये राहण्यासाठी आले होते. 30 डिसेंबर, 2024 ला हे कुटुंब राहण्यासाठी आले. यामध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या पाच भावंडांचा समावेश होता. पण क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून 24 वर्षीय अर्शद नामक मुलाने आपल्या आईचा आणि चार बहिणींची हत्या केल्याची धक्कादायक घडली आहे. मृतांमध्ये अर्शदची आई अस्मा आणि चार बहिणी आलिया (वय वर्षे 09), अलशिया (वय वर्षे 19), अक्सा (वय वर्षे 16) आणि रहमीन (वय वर्षे 18) यांचा समावेश आहे. दरम्यान, अर्शदचे वडील सध्या घटनास्थळावरून फरार आहेत. त्यामुळे त्यांचाही या हत्येत सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्यामुळे आता पोलिसांकडून अर्शदच्या वडिलांचा शोध घेण्यात येण्यात येत आहे. तर, आरोपीने ब्लेडच्या साहाय्याने आपल्या चारही बहिणींसह आईचा गळा वार करून त्यांची हत्या केली आहे.
लखनऊच्या ठाणे नाका हद्दीत घडलेल्या या घटनेची माहिती पोलिसांना बुधवारी (ता. 01 जानेवारी 2025) सकाळी मिळाली. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी अर्शदला पोलिसांनी अटक केली आहे. प्राथमिक चौकशीत आरोपीने कौटुंबिक कलहातून हत्येचे कारण सांगितले. तरी सत्य काय आहे. याबाबत पोलीस अजूनही तपास करत आहेत. तर, या घटनेची माहिती देताना डीसीपी रवीना यांनी सांगितले की, आज हॉटेल शरणजीतच्या एका खोलीत पाच जणांचे मृतदेह सापडले. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळ गाठून आग्रा येथील रहिवासी असलेल्या अर्शद नावाच्या मुलाला अटक केली. प्राथमिक चौकशीतच त्याने खुनाची कबुली दिली. कौटुंबिक वादातून त्याने आपल्या चार बहिणी आणि आईची हत्या केल्याचे त्याने सांगितले. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे. पुढील तपास सुरू आहे. तर, हे कुटुंब इस्लाम नगर, तेधी बगिया, कुबेरपूर, आग्रा येथील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.