नवी दिल्ली : मध्य प्रदेशच्या नीमच जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली अनोखी मागणी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. सर्जना गावातील शेतकरी संदीप पाटीदार हा गेल्या 10 वर्षांपासून आपल्या शेतात पोहोचण्यासाठी संघर्ष करत आहे. शेतात जाण्याचा रस्ता बंद असल्यामुळे नाराज संदीप पाटीदार याने जनसुनावणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांकडे हेलिकॉप्टरची मागणी केली आहे. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आम्ही रस्त्याची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे संदीप पाटीदारला त्याच्या शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता मिळेल का? हे पाहावे लागेल. (Madhya Pradesh Neemuch district farmer Sandeep Patidar requested a helicopter from the district collector to go to his fields)
संदीप पाटीदार याने माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, माझ्या शेतात जाण्याचा मार्ग गुंडांनी रोखला आहे. त्यामुळे मला शेती करता येत नाही. या प्रकरणी मी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाकडून माझ्या याचिकेसंदर्भात आदेश प्राप्त झाला आहे. परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून फक्त कागदोपत्री काम केले जात आहे आणि जिल्हाधिकारी या आदेशाची अंमलबजावणी करताना दिसत नाहीत. मी गेल्या दीड वर्षांपासून माझी समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाकडे विनवणी करत आहे, पण यावर कोणताही उपाय झालेला नाही. त्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली की, तुम्ही माझ्या शेतात जाण्याचा रस्ता मोकळा करू शकत नसाल, तर किमान मला एक हेलिकॉप्टर द्या, जेणेकरून मी माझ्या शेतात जाऊन शेती करू शकेन.
हेही वाचा – Terrorist attack : राजौरीमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला; सुंदरबनी परिसरात केला गोळीबार
संदीप पाटीदार याच्या मागणीवर नीमचचे जिल्हाधिकारी हिमांशू चंद्रा म्हणाले की, सदर शेतकऱ्याचे प्रकरण आमच्या निदर्शनास आले आहे. शेतकऱ्यांची मूळ समस्या त्याच्या शेतीकडे जाणाऱ्या रस्त्याची आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून त्यावर स्थगिती देण्यात आली आहे. मात्र तरीही, आम्ही रस्त्याची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन हिमांशू चंद्रा यांनी दिले आहे. त्यामुळे गुंडांचा बंदोबस्त करून संदीप पाटीदार या शेतकऱ्याला त्याच्या शेतात जाण्यासाठी रस्ता करून दिला जातो? की त्याने केलेली हेलिकॉप्टरची अनोखी मागणी पूर्ण केली जाते? हे पाहावे लागेल.
हेही वाचा – Sajjan Kumar : सज्जन कुमारांना फाशीऐवजी जन्मठेप का? न्यायाधिशांनी सांगितले कारण