(Maha Kumbh 2025) नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे गेल्या 45 दिवसांपासून सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याचा आज, बुधवारी शेवटचा दिवस आहे. महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर, त्रिवेणी संगमात स्नान करण्यासाठी देशभरातील कोट्यवधी भाविक जमा होत आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार, यावर्षी आतापर्यंत 65 कोटींहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला आहे. या कुंभमेळ्यादरम्यान, नागा साधूंच्या भव्य मिरवणुका आणि तीन अमृत स्नानाचे आयोजन करण्यात आले होते. 13 जानेवारीपासून सुरू झालेल्या या सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. विदेशी प्रसार माध्यमांनीही याची दखल घेतली आहे. (Crowd of devotees more than the population of America)
महाकुंभ मेळ्याची भव्यता आणि धार्मिक महत्त्व विदेशी माध्यमांनी ठळकपणे कव्हर केले आहे. महाकुंभ मेळ्यात अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त भाविक आले होते आणि सहा आठवड्यांच्या कालावधीत ही संख्या जवळजवळ 50 कोटींपेक्षा जास्त होण्याचा अंदाज असल्याचे “वॉल स्ट्रीट जर्नल”ने म्हटले आहे. “हफिंग्टन पोस्ट” ने महाकुंभाचे वर्णन जगातील सर्वात मोठा तीर्थयात्रा मेळा म्हणून केले असून या कुंभमेळ्याशी निगडीत धार्मिक विधी आणि श्रद्धा यांचा तपशील दिला आहे. “न्यू यॉर्क टाइम्स”ने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये महाकुंभाचे वर्णन एक पवित्र सोहळा, असे करतानाच, हा सोहळा भाविकांबरोबरच पर्यटक, राजकारणी आणि सेलिब्रिटींनाही आकर्षित करत असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा – Thackeray Vs Shinde : पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी शिंदेंकडून ऑपरेशन टायगर?
महाशिवरात्रीला अंतिम स्नानाद्वारे या सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवाची सागंता होईल. शुभ वेळ आणि मुहूर्ताची वाट न पाहता, भाविकांनी मध्यरात्रीपासून पवित्र स्नान करण्यास सुरुवात केली. त्रिवेणी संगमाकडे जाणारे सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने गजबजलेले आहेत. संगमावर श्रद्धा, भक्ती आणि विश्वास याचा अपूर्व संगम दिसत आहे. महाशिवरात्रीला संगमात स्नान करण्यासाठी आलेल्या भाविकांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. संगमाजवळच्या घाटांवर सर्वत्र स्नानासाठी जमलेले भाविकच दिसत आहेत.
आता कार्यक्रम संपल्यानंतर, भाविक आपापल्या घरी परततील. त्यानंतर कुंभमेळ्याच्या स्थळाची स्वच्छता करणे आणि ते पूर्ववत करण्याचे आव्हान आयोजकांसमोर असेल. सरकारी आकडेवारीनुसार, बुधवारी पहाटे 2 वाजेपर्यंत महाशिवरात्रीनिमित्त 11.66 लाखांहून अधिक भाविकांनी संगमात स्नान केले. पुढील दोन तासांत ही संख्या 25.64 लाखांवर पोहोचली आणि सकाळी 7 वाजेपर्यंत 41.11 लाख झाली. सकाळी 10 वाजेपर्यंत एकूण 81.09 लाख भाविकांनी ‘स्नान’ घेतले होते. गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर भाविकांची मोठी गर्दी होती.
हेही वाचा – Thackeray Vs Shinde : शिंदे काळात मंत्रालय ही दलाल – फिक्सरांची जत्राच, काय म्हणाले उद्धव ठाकरे