(Maha Kumbh 2025) मुंबई : उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील महाकुंभाला 50 कोटी लोकांनी मलमूत्रयुक्त पाण्यात आंघोळ केली हे चित्र भयावह आहे. हिंदूंचा अपमान आहे. पुण्यप्राप्ती, मोक्षप्राप्तीचे ढोंग आहे. या ढोंगाला क्षमा नाही. कुंभास आलेले पाच हजारांवर लोक आजही बेपत्ता आहेत. लहान मुले हरवली आहेत. त्यांच्या माता आक्रोश करीत आहेत. याला काय मोक्ष मिळाला म्हणायचे? या अनागोंदीस सरकार जबाबदार आहे. त्याची जबाबदारी सरकारने घ्यायलाच हवी, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खडसावले आहे. (Uddhav Thackeray blames Yogi government for chaos)
योगी आदित्यनाथ हे एक अद्भुत गृहस्थ आहेत. ते कडवट हिंदू आहेत, पण त्यांच्यात भगवान शंकराप्रमाणे विष म्हणजे हलाहल प्राशन करण्याचीही शक्ती आहे काय, ही शंका आहे. प्रयागराज येथे सध्या महाकुंभ सोहळा सुरू आहे. आतापर्यंत 50 कोटी भाविकांनी गंगेत स्नान करून मोक्षप्राप्ती केली किंवा पुण्य मिळवले. हे पुण्य जनतेस आमच्यामुळे मिळाले असे भारतीय जनता पक्षाचे सांगणे आहे. त्यामुळे कुंभात जास्तीत जास्त लोकांनी येऊन डुबकी मारावी, असे निमंत्रण योगी महाराजांनी दिले, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
हेही वाचा – Thackeray vs Yogi Adityanath : आदित्यनाथांनी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलला खोटे पाडले, ठाकरेंची टीका
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलला स्पष्ट केले की, ज्या गंगेत राष्ट्रपती-पंतप्रधान मोदी, अदानी यांनी स्नान केले, त्यातले पाणी ‘जल-मल संक्रमित’ आहे. म्हणजे गटारातला ‘मैला’ तसेच इतर सर्व घाण, बॅक्टेरिया त्या पाण्यात आढळले. गंगा शुद्धीकरणासाठी आतापर्यंत लाखो कोटी रुपये खर्च झाले. एक स्वतंत्र मंत्रालय त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थापन केले. पण साध्य काय झाले? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.
प्रयागराजच्या कुंभ सोहळ्यावर 10 हजार कोटी खर्च झाले. हा एवढा खर्च खरंच झाला असता तर भाविकांना मलमूत्रयुक्त पाण्यात डुबकी मारून पुण्य मिळवायची वेळ आली नसती. कुंभाला निघालेले अनेक भाविक रेल्वे स्थानकांवर चिरडून मेले, जे कसेबसे प्रयागराजला पोहोचले त्यातले शेकडो चेंगराचेंगरीत मेले. या सगळ्या मृतांना आता मोक्ष मिळाला असे भंपक बाबालोक म्हणत आहेत. श्रद्धाळूंना प्रयागतीर्थी पिण्यासाठी साधे पाणीही सरकार देऊ शकले नाही, ते नद्या काय स्वच्छ करणार? असा बोचरा सवालही त्यांनी केला आहे.
हेही वाचा – Thackeray vs Modi : मोदींचा हाच ‘सबका साथ सबका विकास’ असेल तर… उद्धव ठाकरेंचा निशाणा