मुंबई : भारतात दर 12 वर्षांनी कुंभमेळा होत असतो. मागील 12 वर्षांपूर्वी म्हणजे 2013मध्ये उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे हा कुंभमेळा पार पडला होता. आता पुन्हा एकदा प्रयागराज येथेच महाकुंभ मेळा होणार आहे. यासाठी लाखो भाविक गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर स्नान करण्यासाठी एकत्र येतात. यावेळी नदीच्या पात्रात स्नान करणाऱ्या साधू आणि भाविकांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. यंदा स्नान करतेवेळी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती ओढावल्यास एक विशेष बोट प्रयागराज येथील घाटावर तैनात राहणार आहे. (Mahakumbh Mela 2025 Fire Fighting Boat For Rescue Operation in Mahakumbh Mela)
मिळालेल्या माहितीनुसार, 12 वर्षांनी प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभ मेळ्याला मोठ्या प्रमाणात भाविक आणि साधूंची गर्दी होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर नदीच्या पात्रात स्नान करणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी फायर फायटिंग बोट तयार करण्यात आली आहे. भोपाल येथे तयार केलेली फायर फायटिंग बोट ही महाकुंभ मेळा 2025 साठी प्रयागराजला रवाना झाली आहे. ही देशातील पहिली फायर फायटिंग बोट आहे. ही बोट महाकुंभ मेळ्याच्यादरम्यान प्रयागराज येथील घाटावर तैनात राहणार आहे. त्यामुळे आग लागल्याची घटना घडल्यास आपत्कालीन परिस्थितीत बचावाचे कार्य करणे सहज शक्य होणार आहे. मंगळवारी या बोटींची तपासणी केल्यानंतर, पहिली बोट ही प्रयागराजसाठी रवाना झाली आहे. या नंतर पुढील 8 ते 10 दिवसांत बाकी 5 बोटी प्रयागराजला रवाना करण्यात येणार आहेत.
पीएस ट्रेडर्सचे मालक प्रियांश शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाकुंभ मेळ्यात अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात असतात. पण प्रचंड गर्दी असल्याने या गाड्या आपत्कालीन परिस्थितीत घटनास्थळी पोहचू शकत नाहीत. त्यामुळे फायर फायटिंग बोट तयार करण्यात आली. त्यापार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी वेगवेगळ्या घाटांवर फायर फायटिंग बोट तैनात करण्यात येणार आहेत. कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी ही बोट मदतीसाठी त्या ठिकाणी पोहचेल. त्यानंतर तेथील आग नियंत्रणात आणून लोकांना वाचवण्याचे काम करेल.
फायर फायटींग बोटीचे बांधकाम यूपी अग्निशमन सेवेच्या वतीने निविदा जारी करून करण्यात आले आहे. या बोटीच्या बांधकामाचे काम भोपाळच्या पीएस ट्रेडर्सना देण्यात आले होते. या बोटीची निर्मिती खास करून कुंभ मेळ्यासाठीच करण्यात आली आहे. या फायर फायटिंग बोटीच्या तपासणीसाठी उत्तर प्रदेश अग्निशमन सेवेच एक पथक, तसेच SDRFपथक अशी दोन्ही पथके आली आहेत.
महाकुंभ मेळ्यानिमित्त एकूण 6 बोटी प्रयागराजला तैनात करण्यात येणार आहेत. या फायर फायटिंग बोटीत एका वेळेस क्रूच्या व्यतिरिक्त 10 माणसांची बसायची सुविधा आहे. या बोटीची मोटार डिझेलवर चालणारी आहे. पण त्याचसोबत यात पेट्रोलसाठी वेगळी टाकी आहे.
महाकुंभ मेळा
भारतासह संपूर्ण जगात कुंभमेळा प्रसिद्ध आहे. कुंभमेळा दर 12 वर्षांनी येत असतो. यंदा 2025मध्ये कुंभमेळा येणार आहे. त्यापूर्वी 2013मध्ये कुंभमेळा पार पडला होता. धार्मिक मान्यतेनुसार, महाकुंभमधील शाही स्नानानंतर सर्व पापांमधून मुक्ती मिळते. दर 12 वर्षानंतर भारतातील चार पवित्र नद्या आणि चार तीर्थस्थानांवर आयोजित केला जातो. परंतु महाकुंभाचं आयोजन केवळ प्रयागराज, नाशिक, हरिद्वार आणि उज्जैन येथे केले जाते.
यंदाही 12 वर्षानंतर महाकुंभ मेळ्याचं आयोजन होणार आहे. 2025 मध्ये 13 जानेवारी 2025 रोजी पौष पौर्णिमेच्या दिवशी महाकुंभ मेळ्याला सुरुवात होणार आहे. त्याचा समारोप 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी होईल. 12 वर्षानंतर प्रयागराजमध्ये महाकुंभ होणार आहे. यापूर्वी 2013मध्ये प्रयागराजला महाकुंभ मेळावा पार पडला होता.
हेही वाचा – Devendra Fadnavis : माओवादग्रस्त भागाच्या सर्वांगीण विकासासाठी…पंतप्रधान मोदींकडून राज्य सरकारचे कौतुक