Tuesday, March 18, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशCM Fadanvis meet PM Modi : मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, झाली या विषयांवर चर्चा

CM Fadanvis meet PM Modi : मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, झाली या विषयांवर चर्चा

Subscribe

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (13 मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. गडचिरोली माईनिंग हब, नागपूर विमानतळ, स्थानिक स्वराज्य संस्थांना वित्त आयोगाचा निधी इत्यादींबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. एकीकडे राज्यात सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशन तर दुसरीकडे विरोधकांकडून सातत्याने गुन्हेगारीमध्ये वाढ झाली असल्याची टीका या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट ही महत्त्वाची मानली जात आहे. (Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis meet Prime Minister Narendra Modi)

हेही वाचा : Atul Bhatkahlakar : छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबावरुन महायुतीमधील आमदारच भिडले 

राज्य सरकारने गडचिरोलीमध्ये पोलाद क्षेत्रात पुढाकार घेतला आहे. गडचिरोली आता देशाची स्टील सिटी म्हणून विकसित होणार आहे. याचदृष्टीने गडचिरोलीला माईनिंग हब म्हणून विकसित करण्यासाठी केंद्राने सहकार्य करावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागपूर विमानतळाच्या कामालादेखील गती देण्यात आली असून त्यामध्ये केंद्र सरकारसंदर्भातील काही विषयांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केल्याची माहिती देण्यात आली. यामुळे विमानतळ कामातील अडसर आता लवकरच दूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना 15 व्या वित्त आयोगाचा निधी लवकरात लवकर मिळावा, याबाबत चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच या सर्व बाबतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

वर्ल्ड ऑडिओ, व्हीज्युअल अँड एन्टरटेंटमेंट समिट आयोजित करण्याची संधी महाराष्ट्राला दिल्याबद्दल या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. 1 ते 4 मे या कालावधीत मुंबईत हे समिट होणार आहे. याचनिमित्ताने मुंबईत आयआयटीच्या धर्तीवर आयआयसीटी (इंडियन इन्स्टिट्युट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी)देखील स्थापन करण्यात येणार असून त्यासाठीदेखील केंद्र सरकार निधी देणार आहे. त्याबद्दलही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.