घरताज्या घडामोडीम्हणूनच महाराष्ट्राच्या Oxygen Express चा 'ग्रीन कॉरिडॉर' गुजरातमार्गे वळवला

म्हणूनच महाराष्ट्राच्या Oxygen Express चा ‘ग्रीन कॉरिडॉर’ गुजरातमार्गे वळवला

Subscribe

विशाखापट्टणम येथून लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (LMO ) चे ऑक्सिजन टॅंकर घेऊन आलेली पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल झाली खरी. पण या ५० तासांच्या प्रवासात रेल्वेच्या नियोजनाची कसोटी होती. शुक्रवारी रात्री ८ वाजून १० मिनिटांनी ही एक्सप्रेस नागपुरात दाखल झाली. त्यानंतर नाशिकला शनिवारी सकाळी पोहचली. या संपुर्ण प्रवासात रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केलेले अचुक नियोजन एक्सप्रेसला ग्रीन रूट मिळवून देण्यासाठी उपयोगी आले. रेल्वेसाठी ऑक्सिजन एक्सप्रेस वेळेत चालवणे ही एक टास्क होती. कळंबोली ते वायझॅग आणि नाशिक असा सगळा प्रवास रेल्वे अधिकाऱ्यांनी मिनिट टू मिनिट नियोजनाने यशस्वी करून दाखवला. त्यामुळेच कोरोनाच्या संकटकाळात ऑक्सिजन घेऊन येणारी ही पहिली वहिली अशी ऑक्सिजन एक्सप्रेस ठरली आहे. पण या संपुर्ण ग्रीन कॉरिडॉरचा मार्ग महाराष्ट्रातून एनवेळी बदलण्याची वेळ रेल्वेवर आली होती. तसेच नियोजित मार्गामध्ये काही बदलही करावे लागले होते.

ग्रीन कॉरिडॉरचे आव्हान सोपे नव्हते 

कळंबोली येथून सुटणाऱ्या ऑक्सिजन एक्सप्रेससाठी रातोरात अशा पद्धतीने रॅम्प विकसित करण्यात आले. रस्त्यावरील ऑक्सिजन टॅंकर हे रेल्वे वॅगॉन्सवर चढण्यासाठी या रॅम्पचा वापर होणार होता. त्यामुळेच रातोरात हे रॅम्प तयार करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य प्रवक्ते शिवाजी शिवाजी सुतार यांनी मिड डे या इंग्रजी दैनिकाशी बोलताना दिली. महत्वाचे म्हणजे रेल्वेने वाहतूक करण्यासाठी हे टॅंकर विशिष्ट आकाराचेच असणे गरजेचे होते. त्यामुळे टॅंकरला वॅगन्सच्या माध्यमातून विशाखापट्टणमचा पल्ला गाठणे शक्य होईल याची काळजी घेण्यात आली. रेल्वेच्या मार्गावर सगळ्या ब्रिजची उंची पाहूनच हे टॅंकर वापरण्यात आले होते. त्यासोबतच विजेचा पुरवठा करणारे ओव्हरहेड वायर्स आणि रेल्वे मार्गावर असणारी विविध बांधकामे या सर्व बाबी लक्षात घेऊनच संपुर्ण ग्रीन रूट आखण्यात आला. अनेक ठिकाणी असणारा घाटांचा भाग, भोगदे, रोड ओव्हर ब्रिज, वळणारे मार्ग, प्लॅटफॉर्मची रूंदी यासारख्या गोष्टी लक्षात घेऊनच संपुर्ण मार्गाची आखणी करण्यात आली.

- Advertisement -

ऑक्सिजन एक्सप्रेसचे गुजरात कनेक्शन 

रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनमध्येच दोन घाट सेक्शन आहेत. भोरघाट आणि कसारा इगतपुरी घाटातून या ऑक्सिजन एक्सप्रेसने मार्ग काढला. अशा प्रकारच्या ट्रेनची वाहतूक करताना नेहमीच उंचीचे आव्हान महत्वाचे असते. ऑक्सिजन टॅंकरची निवड केली होती ती म्हणजे T-1618 या श्रेणीच्या ऑक्सिजन टॅंकरची. या टॅंकरची उंची ही ३३२० एमएम इतकी होती. तर रेल्वेच्या फ्लॅट वॅगॉन्सची उंची ही १२९० एमएम इतकी होती. टॅंकरच्या उंचीमुळे हा मार्ग घाटमार्ग आणि टनेल एवजी वसई, सूरत, जळगाव या मार्गाने बदलावा लागला. शिवाय लिक्विड ऑक्सिजन असल्याने या एक्सप्रेसच्या वेगासाठीच्या मर्यादा होत्या. ऑक्सिजन भरलेल्या टॅंकरची वाहतूक करताना प्रेशरचा मुद्दाही महत्वाचा होता. या ऑक्सिजन एक्सप्रेसमध्ये ७ टॅंकरच्या माध्यमातून १०० टन इतका लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची वाहतूक करण्यात आली. त्यामुळे दहा तासांचा वेळ हा ऑक्सिजन भरण्यासाठी गेला. तर विशाखापट्टणम येथून नागपुर गाठायला या ट्रेनला २१ तासांचा अवधी लागला. या एक्सप्रेसमधील ३ टॅंकर हे नागपूर येथे शुक्रवारी रात्री अनलोड करण्यात आले. तर उर्वरीत टॅंकर्स हे नाशिकला पोहचण्यासाठी १२ तासांचा कालावधी लागला.

लांब पल्ल्याच्या गाडीच्या माध्यमातून ऑक्सिजन टॅंकरची वाहतूक ही रस्ते वाहतूकीच्या तुलनेत सुलभ आहे. रस्ते वाहतूकीदरम्यान टॅंकर ड्रायव्हरला ठराविक कालावधीनंतर थांबावे लागते. पण ट्रेनच्या बाबतीत मात्र ट्रेन २४ तास सलग धावू शकते हा फायदा आहे. या ऑक्सिजन एक्सप्रेसचा मार्ग विनाअडथळा असावा यासाठीच ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी विनाअडथळा ही ट्रेन धावण्यासाठी या ग्रीन कॉरिडॉरचा उपयोग झाला, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्याने स्पष्ट केली.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -