(Mahashivratri and Mahakumbh 2025) प्रयागराज : महाशिवरात्रीनिमित्त आज, बुधवारी महाकुंभातील सहावे आणि शेवटचे स्नान होत आहे. यानिमित्ताने पवित्र संगम स्नानासाठी मोठ्या संख्येने भाविक महाकुंभात पोहोचत आहेत. संपूर्ण महाकुंभ परिसरात हाय अलर्ट आहे. त्रिवेणी संगमावर ड्रोन आणि एआय कॅमेऱ्यांद्वारेही लक्ष ठेवले जात आहे. शिवाय, परिसरात वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. आज सुमारे दोन कोटी भाविक स्नान करतील अशी अपेक्षा आहे. पहाटेपासून सात वाजेपर्यंत सुमारे 41 लाख भाविकांनी स्नान केले होते. तर, आतापर्यंत 65 कोटींहून अधिक भाविकांनी महाकुंभात जाऊन स्नान केले आहे.
महाशिवरात्रीला अंतिम स्नानाद्वारे 13 जानेवारीपासून सुरू झालेल्या 45 दिवसांच्या या सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवाची सागंता होईल. शुभ वेळ आणि मुहूर्ताची वाट न पाहता, भाविकांनी मध्यरात्रीपासून पवित्र स्नान करण्यास सुरुवात केली. त्रिवेणी संगमाकडे जाणारे सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने गजबजलेले आहेत. संगमावर श्रद्धा, भक्ती आणि विश्वास दिसत आहे. महाशिवरात्रीला संगमात स्नान करण्यासाठी आलेल्या भाविकांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. संगमाजवळच्या घाटांवर सर्वत्र स्नानासाठी जमलेले भाविकच दिसत आहेत.
हेही वाचा – Sanjay Raut : फिक्सर ओएसडी, पीए यांची नावे देणारे मंत्री कोण? राऊतांनी मागितली यादी
महाकुंभच्या व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुार, मंगळवारी रात्री 8 वाजेपर्यंत दीड कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केले होते. तर, बुधवारी सकाळी 7 वाजेपर्यंत 41 लाखांहून अधिक भावांनी स्नान केले. मंगळवारपर्यंत 64.77 कोटी लोकांनी स्नान केले होते. सर्व मार्गांवरील भाविक जय गंगा मैया, हर हर महादेव आणि जय श्री राम असा जयघोष लाखो भाविक करत असल्याने वातावरण भक्तिमय झाले आहे.
महाशिवरात्री आणि महाकुंभाच्या शेवटच्या स्नानासाठी सुमारे दोन कोटी भाविकांच्या आगमनासाठी कुंभमेळा प्रशासनाने विशेष तयारी केली आहे. येथे स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षात एक पथक 24 तास तैनात आहे. हे पथक परिसरातील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे. शिवाय, संगम घाट, महाकुंभ परिसर, प्रमुख क्षेत्रे, रेल्वे स्थानके आणि बसस्थानकांवर येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन हे पथक नियंत्रण राखण्यासाठी समन्वय साधण्याचे काम करत आहे.
महाकुंभ परिसरात २७ फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत नो व्हेइकल झोन घोषित करण्यात आले आहे. वाढत्या गर्दीचा अंदाज घेऊन येथील निर्बंध वाढवले जाऊ शकतात. पोलिसांव्यतिरिक्त, संगम आणि इतर स्नान घाटांवर निमलष्करी दल देखील तैनात करण्यात आले आहे. भाविकांच्या आगमन आणि प्रस्थानासाठी वेगवेगळे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
हेही वाचा – Thackeray And Fadnavis : फिक्सरांचा सिक्सर अडवा, ठाकरेंनी केले फडणवीसांचे कौतुक