महाराष्ट्रातील महायुती सरकारचा मुख्यमंत्रिपदाचा तिढा सोडविण्यासाठी गुरूवारी रात्री दिल्लीत जोरदार खलबते झाली. महायुतीच्या तीनही घटकपक्षांतील नेत्यांची तब्बल अडीच तास गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली. बैठकीनंतर काय चर्चा झाली, याची माहिती काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मात्र, बैठकीत एकीकडे देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांचे चेहरे हसरे होते. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गंभीर असलेल्या चेहऱ्याबद्दलही चर्चा रंगली आहे. यावर शिंदेंनी भाष्य केलं आहे.
बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे म्हणाले, “महायुतीची महाबैठक अतिशय सकारात्मक झाली. अजून एकदा बैठक होईल. त्यात महायुतीचा मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाबाबत चर्चा होईल. आता मुंबईत बैठक होणार आहे. अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांच्यासोबतही माझी चर्चा झाली.”
हेही वाचा : पहिल्यांदाच समोर आले शहाजीबापू, तीन नेत्यांना केलं टार्गेट; पराभवासाठी जिवलग मित्राला दिला दोष
“महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराला मी पाठिंबा दिला आहे. भाजपच्या विधिमंडळ नेत्याची निवड होईल. त्यानंतर मुख्यमंत्री शपथ घेतील. अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांच्याशी सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा झाली. वेगळं काहीही बोलणं झालं नाही. आमच्यात पूर्णपणे समन्वय आहे. आम्ही सकारात्मक आहोत. आम्हाला राज्यातील जनतेनं बहुमत दिलं आहे. त्याचा आदर आम्ही करतो. लवकरच सरकार स्थापन करू,” असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
शपथविधी कधी होईल, असा प्रश्न विचारल्यावर एकनाथ शिंदेंनी म्हटलं, “अरे तुम्ही लोक का घाई करत आहात? सगळं व्यवस्थित होईल. काळजीवाहू मुख्यमंत्री मी असल्यानं सगळ्यांची काळजी घेत आहे. मात्र, ‘लाडका भाऊ’ म्हणून माझी नवीन ओळख झाली आहे. सगळ्या पदांपेक्षा ते मोठं पद मला मिळालं आहे.”
अमित शाहांसोबत असलेल्या फोटोत तुम्ही गंभीर दिसत आहात, असे विचारल्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, “कधी गंभीर, कधी हसरा चेहरा तुम्ही ठरवता. मात्र, आजही मी खूश आहे. कारण, दोन-अडीच वर्षात महाराष्ट्रातील जनतेसाठी काम केले. महाराष्ट्राच्या जनतेसाठी कल्याणकारी योजना राबविल्या. त्यात ‘लाडकी बहीण’ ही महत्त्वाची योजना आहे. लाडक्या योजनामुळे कधी आजपर्यंत मिळालं नव्हतं, एवढं बहुमत मिळालं आहे. जनता सरकारवर खूश आहे. यावर आम्ही समाधानी आहोत.”
हेही वाचा : “10 मिनिटांत यांना आमदार केलं, मात्र आता फडणवीसांचा हा पठ्ठ्या…”, राम सातपुतेंचा रणजितदादांना इशारा