नवी दिल्ली : अत्यंत निर्घृणतेने ठार मारण्यात आलेले पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुरेश चंद्राकर याला रविवारी रात्री हैदराबाद येथून अटक करण्यात आली. सुरेश चंद्राकर हा या हत्या प्रकरणातील कथित मास्टरमाइंड असल्याचे सांगितले जात आहे.
पोलीस सध्या सुरेश चंद्राकरची चौकशी करत आहेत. चंद्राकरच्या पत्नीला देखील छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातून अटक करण्यात आली असून तिचीही चौकशी सुरू आहे. मुकेश चंद्राकर यांची हत्या झाल्यापासून सुरेश चंद्राकर फरार होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदराबाद येथील आपल्या ड्रायव्हरच्या घरात सुरेश लपला होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी 200 सीसीटीव्ही फुटेज पाहिले आणि जवळपास 300 मोबाइल नंबर्सचा शोध घेतला.
हेही वाचा – Mukesh Chandrakar : क्रूरतेचा कळस; ठार मारण्यापूर्वी मुकेश चंद्राकारचे केले हाल; शवविच्छेदन अहवाल काय सांगतो
10 वर्षांपासून मुकेश चंद्राकार यांनी गेली छत्तीसगडमधील बस्तरचे वास्तव जगासमोर मांडण्याचे काम केले. त्यांच्या बस्तर जंक्शन या यूट्युब चॅनलद्वारे माओवाद्यांच्या कॅम्पचे थेट प्रक्षेपण करत खळबळ उडवली होती. दोनच दिवसांपूर्वी त्यांचा मृतदेह सापडला. त्यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. त्यातून चंद्राकार यांना किती क्रूरतेने मारण्यात आले, याचा उल्लेख करण्यात आला आहे.
मुकेश यांना अत्यंत हाल हाल करून मारण्यात आले. त्यांचे लिव्हर चार तुकड्यात सापडले, तर मानेचे हाड देखील तुटलेले होते. याशिवाय हाताच्या हाडाचे देखील दोन तुकडे सापडले. हृदय पूर्णपणे फाटलेले होते. डोक्यावरही 15 गंभीर जखमा आहेत.
आपल्या 12 वर्षांच्या सेवेमध्ये कोणालाही एवढ्या क्रूरतेने मारलेले पाहिले नसल्याचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी म्हटले आहे. त्यांना अत्यंत थंड डोक्याने आणि निष्ठूरतेने मारण्यात आल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मुकेश चंद्राकार यांना मारून ठेकेदार सुरेश चंद्राकार यांनी हा मृतदेह टाकीत टाकला होता.
स्वतंत्र पत्रकारिता करणाऱ्या चंद्राकर यांना नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बीजापूर मधील पुजारी पारा येथील आपल्या घरातून बाहेर पडताना शेवटचे पाहिले गेले होते. मात्र, ते परतून न आल्याने त्यांचा भाऊ युकेश याने दुसऱ्या दिवशी ते हरवल्याची तक्रार दाखल केली होती.
हेही वाचा – Chhattisgarh Naxal Attack : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा हल्ला; 9 जवान शहीद, 6 गंभीर जखमी
तपासाअंती मुकेश चंद्राकर याचा मृतदेह त्यांच्या घराच्या जवळपासच आढळला. या प्रकरणी सुरेश चंद्राकरसह मुकेश यांच्या दोन नातेवाईकांना देखील अटक करण्यात आली आहे. मुकेश यांचा चुलत भाऊ रितेश चंद्राकर याला शनिवारी रायपूर विमानतळावरून अटक करण्यात आली तर सुपरवायझर महेंद्र रामटेके आणि मुकेश यांच्या अन्य एका नातेवाईक दिनेश चंद्राकर या दोघांना बिजापूर येथून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी सुरेश चंद्राकर याची काही बॅंक खाती देखील गोठवली आहेत.
छत्तीसगडमधील विजापूरमध्ये दोन दिवसांपासून बेपत्ता पत्रकाराचा मृतदेह सापडला. शुक्रवारी त्यांचा मृतदेह ठेकेदाराच्या कंपाऊंडमध्ये बांधलेल्या सेप्टिक टाकीत सापडला. मुकेश चंद्राकर यांनी कंत्राटदार सुरेश चंद्राकर विरोधात रस्तेबांधणीतील कथित भ्रष्टाचाराची बातमी दिली होती. त्यामुळे मुकेशची हत्या झाल्याचा संशय व्यक्त छत्तीसगडमधील पत्रकारांनी व्यक्त केला होता. त्याचे शेवटचे लोकेशन देखील ठेकेदाराने बांधलेले कंपाऊंड असल्याचे सांगितले जात आहे.