लोकायुक्त कायदा करा, नाहीतर पायउतार व्हा

अण्णा हजारेंचा पुन्हा ठाकरे सरकारला आंदोलनाचा इशारा

anna hazare cancel fast against wine selling in supermarket

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकायुक्त कायद्याच्या मुद्यावरून पुन्हा एकदा ठाकरे सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. एकतर लोकायुक्त कायदा करा, अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा, असा इशारा अण्णा हजारेंनी ठाकरे सरकारला दिला आहे. लोकायुक्त कायदा बनविण्याचे लेखी आश्वासन देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले होते, मात्र अडीच वर्षे होऊनही लोकायुक्त कायद्यासंदर्भात काहीच हालचाली न झाल्याने अण्णा हजारेंनी खंत व्यक्त केली आहे.

अण्णा हजारेंनी रविवारी माध्यमांशी बोलताना ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागले. लोकायुक्त कायदा तयार करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या सत्तेच्या कार्यकाळात आश्वासन दिले होते. फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार पायउतार झाल्यानंतर सत्तेत आलेल्या ठाकरे सरकारनेदेखील लोकायुक्त कायदा तयार करण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी सरकारने लेखी आश्वासनही दिले होते. लोकायुक्त कायद्याच्या अनुषंगाने सात बैठका पार पडल्या, मात्र दोन वर्षे उलटूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर बोलण्यास तयार नसल्याचे अण्णा हजारे म्हणाले.

पुन्हा जनआंदोलनाची गरज
मुख्यमंत्री बोलण्यास तयार नाही. नेमके काय झाले ते समजायला मार्ग नाही. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात मोठे जनआंदोलन करण्याची गरज आहे. यासाठी राज्यातील 35 जिल्ह्यांत आमची कमिटी तयार झाल्याची माहिती अण्णांनी दिली. आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही अण्णा हजारेंनी निशाणा साधला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाची दोन राज्यांत सत्ता आली, पण त्या राज्यांत लोकायुक्त कायदा तयार करण्यात आला नाही याचे दु:ख वाटते, असेही अण्णा हजारे म्हणाले.