काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी चुरस, मल्लिकार्जुन खर्गे यांनी भरला उमेदवारी अर्ज

mallikarjun kharge

नवी दिल्ली – एकीकडे अशोक गहलोत यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतलेली असताना दुसरीकडे काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना अशोक गहलोत, दिग्विजय सिंह, प्रमोद तिवारी, पी.एल.पुनिया, ए.के.एंटनी, पवन कुमार बंसल आणि मुकुल वासिनक उपस्थित होते. तसंच, काँग्रसेमधील जी-२३ समूहातील आनंद शर्मा आणि मनीष तिवारीसुद्धा यावेळी हजर होते. खर्गे पक्षातील सर्वांत वरिष्ठ नेते आहेत, तसंच ते दलित समाजातून आहेत, असं मनीष तिवारी म्हणाले. आज सकाळीच दिग्विजय सिंह यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर, लगेच उमेदवारी अर्ज दाखल केला.

काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर झाल्यापासून शर्यतीत कोण कोण येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सुरुवातीला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, आपण अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचं काल त्यांनी जाहीर केलं. त्यानंतर आज लागलीच मल्लिकार्जून खर्गे यांनी उमेदवारी जाहीर केली. त्यांनी आज उमेदवारी अर्ज भरला असून काही दिवसांपूर्वी शशी थरुर यांनीसुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. माजी केंद्रीय मंत्री मल्लिकार्जून खर्गे यांना नेहरू-गांधी कुटुंबाचा विश्वासू नेता मानले जातात. अशोक गहलोतही नेहरू-गांधी कुटुंबाचे विश्वासू नेता आहेत.

हेही वाचा – काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक: अशोक गहलोतांनी माघार घेतल्यानंतर ‘हा’ ज्येष्ठ नेता शर्यतीत

‘अध्यक्ष न झाल्याने मला अजिबात दुःख नाही. मल्लिकार्जून खर्गे यांनी अध्यक्ष व्हावं याकरता मीसुद्धा प्रस्ताव ठेवला होता. सोनिया गांधी जी जबाबदारी उचलीत त्या पूर्ण करेन. काँग्रेसमधील सर्व वरिष्ठ नेत्यांनी मिळून मल्लिकार्जून खर्गे यांचं नाव जाहीर केलं आहे. आजच्या काळात अशा नेत्यांची गरज आहे. काँग्रेसचा अध्यक्ष सर्वोच्च असतात,’ असं अशोक गहलोत यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा – बंजारा समाजाचे सुनील महाराज यांनी केला शिवसेनेत प्रवेश, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण असणार यावरून पेच निर्माण झाला होता. सोनिया गांधींनंतर पुढचा अध्यक्ष राहुल गांधी असणार असा कयास लावला जात होता. पक्षातील अनेक नेत्यांनी तशीच मागणी केली होती. मात्र, राहुल गांधी यांनी अध्यक्षपदासाठी स्पष्ट नकार दिला. २२ सप्टेंबर रोजी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली. त्यानंतर, २४ सप्टेंबरपासून फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ८ ऑक्टोबरपर्यंत उमेदवार अर्ज मागे घेऊ शकतात. तर, १७ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणरा आहे. त्यानंतर लगेच निकाल लागणार असून १९ ऑक्टोबर रोजी पक्षाला नवीन अध्यक्ष मिळणार आहे. २४ वर्षांनंतर गांधी कुटुंबाच्या बाहेरील व्यक्ती काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होणार आहे. सीताराम केसरी हे अखेरचे बिगर गांधी अध्यक्ष होते.