ममता म्हणतात, महाराष्ट्रातील घडामोडींचा राष्ट्रपती निवडणुकीवर परिणाम

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदासाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात अलीकडेच झालेल्या सत्तांतर नाट्याचा परिणाम या निवडणुकीवर होईल, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना वाटते. तसेच, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा उमेदवार जाहीर करण्यापूर्वी भाजपाने आपल्याशी चर्चा करायला हवी होती, असे मत त्यांनी व्यक्त केले.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 64 वर्षीय द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. तर, त्यांच्याविरोधात 84 वर्षीय माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा उतरले असून ते विरोधकांचे संयुक्त उमेदवार आहेत. तथापि, मुर्मू यांचे नाव जाहीर करण्यापूर्वी भाजपाने आमच्याशी चर्चा केली नाही. त्यांनी आमची मते विचारात घेतली नाहीत. तसे केले असते तर, आम्ही विचार केला असता.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे पुरेसे संख्याबळ असल्याने मुर्मू यांचा विजय म्हणजे केवळ औपचारिकताच असेल आणि त्यांची निवड झाल्यास त्या देशातील पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरतील. त्यातच विरोधी गटात असलेल्या जनता दल (सेक्युलर)ने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. त्यातच महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार कोसळून भाजपाच्या पाठिंब्यावर शिवसेनेचे सरकार आल्याने द्रौपदी मु्र्मू यांच्या विजयाची शक्यता बळावली आहे. तरीही आम्ही आता विरोधी पक्ष जसे सांगतील तसे आम्ही भूमिका घेऊ, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.