Monday, May 3, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश मोदी-शहांना पराभूत करता येतं हे ममतादीदींनी दाखवून दिलं - शिवसेना

मोदी-शहांना पराभूत करता येतं हे ममतादीदींनी दाखवून दिलं – शिवसेना

पराभवाची नैतिक जबाबदारी कोणी घ्यायची ते मोदी-शाह-नड्डांनी ठरवायला हवं - शिवसेना

Related Story

- Advertisement -

साऱ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल रविवारी लागला. यामध्ये केंद्रातील सत्ता हाती असलेल्या बलाढ्य भाजपाला धूळ चारत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने घवघवीत यश मिळवलं. दोनशेहून अधिक जागा मिळवत तृणमूल काँग्रेसने स्वत: चं वर्चस्व सिद्ध केलं. घवघवीत यशाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने ममता बॅनर्जी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. जखमी वाघिणीचा विजय असल्याचं शिवसेनेने म्हटलं आहे. मोदी-शहांना पराभूत करता येतं हे ममतादीदींनी दाखवून दिलं, असं शिवसेनेने ‘सामना’ या त्यांच्या मुखपत्रातून म्हटलं आहे.

“बंगालात काय होणार, याकडेच सगळय़ांचे लक्ष होते. कारण देशात थैमान घालत असलेल्या महाभयंकर कोरोना महामारीस हरवायचे सोडून पंतप्रधान मोदींसह संपूर्ण केंद्र सरकार प. बंगालात ममता बॅनर्जी व त्यांच्या तृणमूल काँग्रेसला हरविण्यासाठी उतरले होते. प. बंगाल जिंकता यावे म्हणून तेथे मतदानाच्या आठ फेऱया लादण्यात आल्या. पण झाले काय? तृणमूल काँग्रेसने मोदी, शहांसह संपूर्ण केंद्र सरकार व भाजपला धूळ चारली आहे. प. बंगालात ममता बॅनर्जी यांनी विजयाची ‘हॅट्ट्रिक’ साधली. इतकेच नव्हे, तर मोदी-शहांनी उभे केलेले तुफान रोखत भाजपचा डाव शंभरच्या आत ‘ऑल आऊट’ करून टाकला,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

- Advertisement -

ममता दीदी २ मेनंतर घरी जातील अशा गमजा केल्या गेल्या. ‘२ मई दीदी गई’ असा घोषा पंतप्रधान मोदी जाहीर सभांतून लावत होते. ममता यांना घरी बसविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने पैसा, सत्ता व सरकारी यंत्रणेचा पूरेपूर वापर केला. तरीही ममता बॅनर्जी यांनी जिद्दीने विजय मिळविला. हा विजय म्हणजे मस्तवाल राजकारणास मिळालेली चपराक असल्याचं शिवसेनेने सामनामधून म्हटलं आहे.

“बंगाल जिंकायचेच, या एका ईर्षेने व द्वेषाने ‘मोदी-शहां’चा भाजप मैदानात उतरला. त्यांनी लाखोंच्या सभा, रोड शो करून कोरोनाबाबतचे सर्व नियम पायदळी तुडवले व निवडणुका संपल्यावर दिल्लीत येऊन कोरोना निवारणाच्या देवपूजेला लागले, पण वेळ हातची गेली आहे. इतके करूनही प. बंगालच्या जनतेने भाजपला साफ नाकारले आहे. प. बंगालात ममतांचा पराभव करण्यासाठी भाजपने काय करायचे बाकी ठेवले? ‘जय श्रीराम’चे नारे देण्यापासून ते ममतांना ‘बेगम ममता’ असे डिवचण्यापर्यंत हिंदू-मुसलमान मतांचे ध्रृवीकरण करण्याचा चोख हातखंडा प्रयोगही सफल झाला नाही. जेथे हिंदूंचे मताधिक्य आहे त्या मतदारसंघांतही ममता बॅनर्जी यांनी विजय मिळविला. या काळात पंतप्रधान मोदी हे बांगलादेशातही सैर करून आले. बांगलादेशचे निर्माते शेख मुजीबूर रेहमान यांना गांधी शांतता पुरस्कार जाहीर करून तो त्यांच्या कन्या बांगलादेशच्या विद्यमान पंतप्रधान शेख हसीना यांना प्रदान करून आले. त्यामुळे प. बंगालातील मुसलमान मते मिळतील असा कयास असावा, पण तसे घडले नाही. ममता बॅनर्जी यांचा पक्षही उभा-आडवा फोडला, पण तरीही विषम लढाईत तृणमूल काँग्रेसने मोदी-शहांच्या राजकारणास धूळ चारली. हे ऐतिहासिक व सगळय़ांसाठी प्रेरणादायी आहे,” असं शिवसेना म्हणाली आहे.

- Advertisement -

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने अत्यंत स्पष्ट बहुमत मिळविले. मोदी-शहा यांनी कृत्रिम ढगांचा गडगडाट केला, पण जमिनीवरील लाट ही प्रत्यक्षात ममता बॅनर्जी यांचीच होती, असा टोला शिवसेनेने भाजप आणि मोदी शहांना लगावला.

दोनशेवर जागा जिंकून ममता यांनी ते सिद्ध केले. प. बंगालातील ममतांचा विजय हा मोदी-शहा-नड्डांचा दारुण पराभव आहे व या पराभवाची नैतिक जबाबदारी कोणी घ्यायची ते त्यांनीच ठरवायला हवे, असा सल्ला वजा टोला शिवसेनेने लगावला आहे.

देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री एखादी निवडणूक व्यक्तिगत प्रतिष्ठेची करतात तेव्हा जय-पराजयाचे श्रेय त्यांनीच स्वीकारायचे असते व राजकारणात तीच परंपरा आहे. पाच राज्यांतील निवडणूक निकालांमुळे देशात असे घडेल आणि तसे घडेल अशा पैजा लागल्या, पण नवे काय घडले? आसाम सोडले तर भारतीय जनता पक्षाने सर्वत्र मातीच खाल्ली आहे, अशी बोचरी टीका शिवसेनेने केली आहे.

मोदी-शहांच्या भाजपकडे निवडणुका जिंकण्याचे तंत्र व यंत्र असले तरी ते अजिंक्य नाहीत व त्यांच्या बोलघेवडेपणावर शहाणीसुरती जनता विश्वास ठेवेलच असे नाही. प. बंगालची वाघीण ऐन निवडणुकीत जखमी झाली. त्या जखमी वाघिणीने देशाच्या राजकारणाला नवी दिशा दिली असल्याचं त्यांच्या ‘सामना’ या मुखपत्रातून शिवसेनेने म्हटलं आहे.

 

- Advertisement -