Birbhum Violence: मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा आज बीरभूम दौरा, दिल्लीत TMCचं शिष्टमंडळ घेणार गृहमंत्र्यांची भेट

पश्चिम बंगालच्या बीरभूममध्ये एक धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे बंगालपासून ते दिल्लीपर्यंतचे राजकारण तापले आहे. या घटनेत ८ जणांना जिवंत जाळण्यात आलं. त्यानंतर आता राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा लागली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज बीरभूमचा दौरा करणार आहेत. इतकेच नाही तर काँग्रेस नेते अधीर रंजन आणि भाजपचे शिष्टमंडळही बीरभूमला जाणार आहे. त्याचवेळी तृणमूल काँग्रेसचे शिष्टमंडळ दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे. याप्रकरणी आतापर्यंत २२ जणांना अटक करण्यात आली आहे.

काल शुभेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळाला घटनास्थळी पोहचू दिले नव्हते. यानंतर शुभेंदू अधिकारी रामपूरहाट येथील रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी या हत्याकांडातील जखमींची भेट घेतली. भाजप पक्षाच्या शिष्टमंडळाला थांबवल्यानंतर जेपी नड्डा यांनी दिल्लीत ५ सदस्यांचे शिष्टमंडळ तयार केले. जे आज बीरभूमला भेट देणार आहे. या संघात चार माजी आयपीएस आहेत. हे पथक घटनास्थळी जाणार आहे. योग्य माहितीसह तपास करेल आणि त्याचा अहवाल लवकरात लवकर जेपी नड्डा यांना सादर करणार आहेत.

भाजपचे समिती सदस्य

राज्यसभा खासदार आणि यूपीचे माजी डीजीपी बृजलाल

मुंबईचे माजी आयुक्त आणि बागपतचे खासदार सत्यपाल सिंह

पश्चिम बंगालमधील भाजपाचे अध्यक्ष सुकांता मजूमदार

राज्यसभा खासदार केसी राममूर्ती आणि माजी आयपीएस भारती घोष

विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा पराभव करणाऱ्या शुभेंदू अधिकारी यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करत केंद्राला हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. केंद्र सरकारनेही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. राज्य सरकारकडून उत्तर मागवण्यात आले आहे, परिणामी TMC चे एक शिष्टमंडळ आज दिल्लीत सकाळी ११.१५ वाजता संसद भवनात गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे.


हेही वाचा : Maharashtra Budget Session 2022 Live Update : विधानसभा सभागृह कामकाजाचा १४ वा दिवस, लक्षवेधीवर चर्चा सुरु