पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज होतील, असे काही ममता बॅनर्जी करणार नाहीत, काँग्रेसची टीका

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवरून (Bharat Jodo Yatra) काँग्रेसने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) नाराज होतील, असे काही ममता बॅनर्जी करणार नाहीत. या दोन नेत्यांमध्ये ‘मो-मो’ समझोता झाला असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.

जेव्हा पंतप्रधान मोदी म्हणतात की, भारताला काँग्रेसमुक्त करायचे आहे, तेव्हा ममता बॅनर्जीही म्हणतात की, काँग्रेसला बंगालमधून मुक्त करायचे आहे. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचे अनेकजण कौतुक करत असताना ममता बॅनर्जी मात्र मौन बाळगून आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे, कौतुक केले तर, पंतप्रधान मोदी नाराज होतील, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी केली आहे. दोघांचेही व्यक्तिमत्व सारखेच आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला कन्याकुमारी येथून सुरुवात झाली. सध्या ही यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये आहे. भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याबाबत राहुल गांधी यानी ममता बॅनर्जी यांना निमंत्रण दिले होते. पण ममता यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाकडून कोणीही या यात्रेत सहभागी झाले नाही, असे अधीर रंजन चौधरी म्हणाले.

यापूर्वी देखील अधीर रंजन चौधरीकडून टीका
अधीर रंजन चौधरी यांनी यापूर्वी देखील नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्या समझोता झाल्याचे म्हटले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि ममता बॅनर्जी यांच्यात त्यावेळी झालेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा दावा केला होता. तर, तृणमूल काँग्रेसचे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागलेला असताना पश्चिम बंगालच्या विधानसभेत केंद्रीय यंत्रणांच्या अतिरेकाविरोधातील प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला. केंद्रीय तपास यंत्रणांच्या या अतिरेकामागे पंतप्रधान मोदी असतील असे आपल्याला वाटत नसल्याचे वक्तव्य ममता बॅनर्जी यांनी त्यावेळी केले होते.