घरट्रेंडिंगतो आला, त्याने दगड फेकला आणि तो विमानासमोर झोपला!

तो आला, त्याने दगड फेकला आणि तो विमानासमोर झोपला!

Subscribe

एका अज्ञात तरुणाने विमानतळावर उड्डाण घेत असलेल्या विमानासमोर थेट आडवं होत खळबळ उडवून दिली आहे.

हल्ली कधी कुठे काय होईल, याचा काही नेम नाही. भोपाळच्या राजा भोज विमानतळावर असाच काहीसा अनुभव आला. घडलेला प्रकार इतका अजब होता, की विमानाचा पायलट, विमातळावरचा ग्राऊंड स्टाफ आणि विमानतळावरील इतर कर्मचाऱ्यांना काही क्षण काय घडलंय, हेच कळेना झालं. जेव्हा त्यांना घडल्या गोष्टीचा साक्षात्कार झाला, तेव्हा मात्र त्यांची चांगलीच त्रेधातिरपिट उडाली. सीआयएसएफच्या विमानतळावरील जवानांनी लागलीच हालचाल करत पावलं उचलली आणि या सगळ्या नाट्यावर पडदा पडला. पण यामुळे विमानात बसलेल्या प्रवाशांचा जीव काही क्षण अगदी गळ्याशी आला होता!

नक्की घडलं काय?

हा प्रकार घडला भोपाळच्या राजा भोज विमानतळावर. रविवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास विमानतळावर बाजूच्या कुंपणाकडून एक अज्ञात व्यक्ती शिरली. हा विशीचा तरूण होता. त्यानं आधी विमानतळावर उभ्या असलेल्या एका खासगी हेलिकॉप्टरवर दगडफेक केली. त्यानंतर तो धावपट्टीवरून येणाऱ्या आणि जयपूरच्या दिशेने उड्डाण घेणाऱ्या एका विमानाच्या समोर थेट आडवा झोपला.

- Advertisement -

तरुणाचं मानसिक संतुलन बिघडलेलं?

हा प्रकार लक्षात येताच विमानतळावरील सीआयएसएफच्या जवानांनी लागलीच धाव घेत या तरुणाला ताब्यात घेतलं. या प्रकारामध्ये विमानाला कोणताही धोका निर्माण झाला नव्हता. मात्र, तरीदेखील या विमानावरील सर्व प्रवाशांना खाली उतरवरण्यात आले. त्यानंतर विमानाची पूर्ण सुरक्षा तपासणी झाल्यानंतर प्रवाशांना पुन्हा विमानात बसवण्यात आलं. दरम्यान, हा तरुण मानसिकदृष्ट्या असंतुलित असल्याची माहिती मिळत असून त्याची चौकशी सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -